Monday, May 5, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

तूर्तास लॉकडाऊन नाही

तूर्तास लॉकडाऊन नाही मुंबई : राज्यातल्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करताना संपूर्ण लॉकडाऊन न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व अकृषी महाविद्यालये बंद ठेवली जाणार आहेत. सर्व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णयही झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात बुधवारी घेतलेल्या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात कडक निर्बंध लावले जातील. मात्र, सध्यातरी संपूर्ण लॉकडाऊन केला जाणार नसल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले. राज्यात आता होम क्वारंटाईनचा कालावधी आता सात दिवसांचा करण्यात आला आहे. याआधी हा कालावधी १० दिवसांचा होता. मात्र, सात दिवसांच्या होम क्वारंटाईननंतर संबंधित व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तीन दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होत आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यातल्या ९० टक्के लोकांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. उरलेल्या १० टक्के रूग्णांमधल्या जेमतेम १-२ टक्के रुग्णांना रूग्णालयात दाखल करावे लागत आहे, असेही टोपे म्हणाले. सध्याच्या नियमांप्रमाणे बुस्टर डोस शासकीय रुग्णालयात घ्यावे लागणार आहेत. मात्र, खासगी रुग्णालयांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस रुग्णालयातच देण्यास परवानगी देण्यात आली आहे, असेही टोपे यांनी सांगितले. राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याचे तसेच, सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उदय सामंत यांनी जाहीर केले. सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमधली परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. विजेची अनुपलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे, विद्यार्थ्यांच्या कुटुंबात किंवा विद्यार्थी कोरोनाबाधित असतील तर त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे. खासगी विद्यापीठांनीदेखील याच निर्णयाचे पालन करायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Comments
Add Comment