
पुणे: शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना बळीचा बकरा बनविण्यात आला आहे. पोलिसांनी मुळापर्यंत जाऊन तपास केल्यास सत्य समोर येईल, असा युक्तिवाद अॅड. मिलिंद पवार यांनी केला.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. दुगावकर यांच्या न्यायालयात सुपे याने जामिनासाठी अर्ज केला आहे.
या प्रकरणात न्यायालयाने पुणे सायबर पोलिसांना नोटीस पाठवीत सुपे यांच्या जामीनावर म्हणणे सादर करण्यास सांगितले. त्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. गैरव्यवहाराशी सुपे यांचा काही एक संबंध नाही. त्यांनी पोलिसांना तपासास पूर्ण सहकार्य केले असल्याचे अॅड. पवार यांनी युक्तिवादादरम्यान नमूद केले.
दरम्यान २०१८ मध्ये निघालेल्या शिक्षक पात्रता परिक्षेच्या जाहिरातीनुसार १५ जुलै २०१८ रोजी ही परिक्षा घेण्यात आली होती. तर तिचा निकाल १२ ऑक्टोबर २०१८ मध्ये लागला होता. ही सर्व परिक्षा घेण्याची जबाबदारी जी. ए. सॉफ्टवेअरकडे होती. अश्विनकुमार महाराष्ट्रासाठी व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. त्याच्यावर परीक्षेचे आयोजन व निकाल संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्याची जबाबदारी होती. .