
मुरबाड (प्रतिनिधी) :मुरबाड आगारातील सर्व बसेस बंद असल्याने ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी मुरबाड आगरातील सुमारे २५० कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. आज या आंदोलनाला जवळपास ५७वा दिवस उजाडला आहे, तरी याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले जात नाही, असे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये बोलले जात आहे. त्यामुळे आतापर्यंत मुरबाड एसटी आगाराचे आर्थिक नुकसान तीन कोटींपर्यंत गेले आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रिक्षा किंवा जीप गाडीने जावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात भुर्दंड बसत आहे; परंतु याकडे सरकार लक्ष देईल का, अशी चर्चा सध्या विद्यार्थी वर्गात सुरू आहे. एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असल्याने हा तिढा अजून सुटला नाही, तर दुसरीकडे सरकार हा तिढा सोडविण्यासाठी पुढे येत नाही, तोवर एसटी कर्मचारीसुद्धा कामावर हजर होणार नाहीत, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. हा तिढा न सुटल्यास ग्रामीण भागांत चालणाऱ्या लालपरीचे काय होईल? अशी चिंता आता प्रवासी वर्गाला लागली आहे.