
मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटचे देखील रुग्ण वाढत चालल्याने राज्याची चिंता वाढली आहे. तसेच जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) येण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळं राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्याचं चित्र गेल्या चार दिवसांत दिसू लागल्यानंतर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिलेत. लोकांनी निर्बंध पाळले नाहीत तर लॉकडाऊन अटळ असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीलाच लॉकडाऊनचे ढग अधिक गडद होऊ लागलेत.
अजित पवार काय म्हणाले...
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी म्हटलं आहे की, राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. चार दिवसांच्या अधिवेशनात राज्यातील 10 मंत्री (ministers), 20 आमदार (mla) कोरोना बाधित (infected coronavirus) झाले आहेत. अजित पवार यांनी म्हटलं आहे की, राज्यात जर कोरोनाचे रुग्ण असेच वाढत राहिले तर निर्बंध वाढवावे लागतील. मुख्यमंत्र्यांची टास्कफोर्ससोबत बैठक झाली. दररोजचा आकडा लक्षात घेऊन कितीपटीत रुग्ण वाढत आहेत, ते पाहून निर्णय घेतला जाईल. जर रुग्णसंख्या वाढत असेल तर नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं अजित पवार म्हणाले.
नवाब मलिक काय म्हणाले...
मंत्री नवाब मलिक म्हणाले की, लग्न आणि समारोहांमध्ये गर्दी होत आहे. सरकारच्या नियमांची अंमलबजावणी नाही केली तर लॉकडाऊन अटळ आहे. जानेवारीमध्ये तिसरी लाट येऊ शकते. अजूनही लोकं नियम पाळत नाहीत. त्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉकडाऊन लावावे लागेल. लॉकडाऊन लावणं लोकांना परवडणारं नाही त्यामुळं काटेकोरपणे नियमांचं पालन करा, असं नवाब मलिक म्हणाले.