Tuesday, May 6, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

नितेश राणेंना निलंबित करण्याचा घाट

नितेश राणेंना निलंबित करण्याचा घाट

मुंबई : ज्या सदस्याने, नितेश राणे यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. ज्या घटनेत कोणाचे नाव घेतले गेले नाही. सभागृहात घटना घडली नाही. अशा घटनेबद्दल काही तरी राग काढून त्यांना निलंबित करण्याचा घाट घातला जात आहे. याठिकाणी कायदा पाळला जात नाही. पण असे पाऊल उचलले गेल्यास आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिला.

शिवसेनेचे सुहास कांदे यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे हा विषय उपस्थित केला. नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी करून त्यांचा अवमान केला. अशा प्रकारची कृत्ये करून कोणीही कोणाचा अवमान करू नये असे या सभागृहात सर्वांनी निश्चित केले. तरीही प्रसिद्धीमाध्यमांसमोर बोलताना राणे यांनी आपण हजार वेळा बोलणार, असे म्हटले. जसे भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टिपण्णी केल्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. राणे यांचे सदस्यत्व निलंबित करावे, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. सुनील प्रभू यांनी त्याला पाठिंबा दिला. समज देऊनही कोण चुकीची भाषा करत असेल, तर त्याला निलंबितच करायला हवे, असे ते म्हणाले. नितेश राणे यांचे सदस्यत्व निलंबित करा, असा आपला आग्रह नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांनी राणे यांची पाठराखण करताना त्यांना ठरवून निलंबित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. आम्ही त्यांच्या वर्तनाचे समर्थन करत नाही. परंतु ज्या घटनेत कोणाचे नाव घेतले गेले नाही. सभागृहात घटना घडली नाही, त्यावर अशी भूमिका आम्ही खपवून घेणार नाही, असे त्यांनी बजावले. राणे सभागृहात उपस्थित नाहीत. त्यांच्याशी बोलून त्यांना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले पाहिजे, असे नवाब मलिक म्हणाले. त्यावर तालिका अध्यक्ष शिरसाट यांनी यावर मंगळवारी अध्यक्षांच्या दालनात बैठक बोलवण्याचे आश्वासन दिले. या काळात दोन्ही बाजूंचे सदस्य आक्रमक झाल्यामुळे १० मिनिटांसाठी कामकाज तहकूब झाले.

Comments
Add Comment