
मुंबई (प्रतिनिधी) ; विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारकडून एक धक्कादायक माहिती देण्यात आली असून राज्यातील २५ हजार महिला गायब झाल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. त्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. ‘हे सांगताना सरकारची जीभ का जड झाली नाही’, अशी विचारणा करताना ‘राज्यात नेमकं चाललंय काय?’, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
‘राज्यातील २५ हजार महिला गायब झाल्याची माहिती सरकारने विधानसभेत दिली. पण हे सांगताना सरकारची जीभ का जड झाली नाही. राज्यातून २५ हजार महिला गायब कशा काय होऊ शकतात? त्यांची तस्करी झालीय का? राज्यात तस्करीचे रॅकेट सक्रीय आहे का? माता भगिनींचं रक्षण करू न शकणारl सरकार आणि कसाई यांच्यात फरक काय?#, असा संताप चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.
त्यांनी ट्विटरला एक व्हिडीयोही शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘काल विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना खुद्द गृहमंत्र्यांनी राज्यातील २५ हजार महिला गायब झाल्याचे कबूल केले आहे. हे बोलताना जीभ जड कशी झाली नाही. नेमकं राज्यात चाललयं काय? कधी पोलीस आयुक्त गायब होतात? कधी गृहमंत्री गायब होतात?कधी मुख्यमंत्री गायब होतात? आणि आता तर राज्यातल्या ६० हजार महिला गायब झाल्या व ज्यामधील काही सापडल्या. मात्र २५ हजार अद्यापही गायब आहेत.
‘सरकारच्या नाकाखाली हे सुरु आहे. पोलीस यंत्रणा नेमकं काय करतेय? पोलीस यंत्रणा काय फक्त राजकारणी आणि सेलिब्रिटींच्या दावणीला बांधली गेली आहे आणि त्यामुळे या गरीब महिलांना शोधण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. देशात सर्वाधिक महिला गायब होणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागत असून हे भूषणावह नाही,’ असे चित्रा वाघ म्हणाल्या.
‘गृहमंत्र्यांना माझा थेट प्रश्न आहे की त्यां महिलांचं नेमकं काय झालं? त्यांची तस्करी झाली आहे काय? राज्यात तस्करीचे रॅकेट सक्रीय आहे का? पोलीस त्यांना शोधून का काढत नाहीत? त्यांना शोधण्याची जबाबादारी सरकारची आहे. अन्यथा सरकार आणि कसाई यांच्यात फरक काय?’, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.