
बीड : म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांनी परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह संजय सानप याला अटक केली आहे. दरम्यान सानपला २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुण्यात सायबर पोलिसांकडून सानपची चौकशी चालू होती. त्यावेळी त्याचा या पेपरफुटी प्रकरणांमध्ये सहभाग आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले आहे.
सानप याचे मूळ गाव असलेल्या वडझरी परिसरातील अनेक मुलांना त्याने नोकरीला लावले असल्याची माहिती समोर येत आहे. याआधी आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणी बीड जिल्ह्यात कारवाई झालेली आहे. या प्रकरणी आतापर्यंत १८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणासह इतर परीक्षांमधील गैरप्रकारातही असल्याचे समोर येत आहे.
फसवणूक झालेल्यांनी पुढे येण्याचे आवाहन
आरोग्य, म्हाडा आणि आता टीईटी परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराचा तपास पुणे सायबर पोलीस ठाण्याचे ७० कर्मचारी करत आहेत. यामध्ये २० अधिकारी आहेत. आरोपींनी टीईटीच्या परीक्षेचा पेपर देण्याच्या आमिषाने अनेकांकडून पैसे घेतले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे उपरोक्त तिन्ही परीक्षांसंदर्भात ज्यांची फसवणूक झाली आहे, अशांनी पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.