Monday, May 5, 2025

महामुंबईताज्या घडामोडीपालघर

एसटी संप : खासगी वाहन चालकांचा मनमानीपणा

एसटी संप : खासगी वाहन चालकांचा मनमानीपणा

वाडा (वार्ताहर) :मागील एक महिन्यापासून संपावर असलेल्या एसटी चालक-वाहकांच्या संपामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत. त्यांच्यासह रोजचा प्रवास खासगी वाहनाने करणाऱ्यांनाही हा प्रवास खिशाला खूपच जड जात आहे. तथापि, परवडत नसताना जास्तीची रक्कम मोजून अनेकजण प्रवास करत आहेत. त्यामुळे खासगी वाहन चालकांना सुगीचे दिवस आले आहेत. दुसरीकडे, एसटी कामगारांच्या संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.

वाडा तालुक्यातील सापने गावातील महिलांनी एसटी आगारातील वाहतूक व्यवस्थापकांना गाठून गावात शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटी सुरू करा, अशी गळ घातली आहे. सापने गाव महामार्गापासून ३ किलोमीटर दूर आहे. वाटेत घनदाट झाडी असून काही ठिकाणी रस्ता निर्जन आहे. गावातील ४० विद्यार्थी-विद्यार्थिनी या रस्त्यावरून प्रवास करत शाळा-कॉलेजात जातात. तसेच रोज रोख व दुप्पट पैसे मोजून शाळा करणे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना डोईजड होते. अशीच परिस्थिती वाडा तालुक्यातील इतर गावांतील विद्याथ्यांची आहे. त्यामुळे अनेक गाव-खेड्यात विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय झालेली आहे.

दरम्यान, वाडा एसटी आगारातील केवळ १२ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तुरळक प्रवासी वाहतूक सुरू असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प आहे. यामुळे खासगी वाहन चालक मनमानी भाडे आकारून विद्यार्थी व प्रवाशांची लूट करत आहेत.

Comments
Add Comment