
पोलादपूर नगरपंचायतीच्या १७ प्रभागांमध्ये ५८ उमेदवारी अर्ज; १३ प्रभागांमध्ये ४३ उमेदवार वैध
नामाप्र प्रभागांतील १४ उमेदवार रिंगणाबाहेर, तर १५ उमेदवारी अर्ज अवैध
शैलेश पालकर
पोलादपूर : नगरपंचायत पोलादपूरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या नामाप्र आरक्षणाला स्थगिती आदेशानंतर पुढील आदेशापर्यंत निवडणूक प्रक्रियेतून नामाप्र आरक्षित प्रभागांमध्ये निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात येऊन २, ८, १० आणि १४ या चार प्रभागांतील सुमारे १४ नामाप्र उमेदवार रिंगणाबाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, उर्वरित १३ प्रभागांमधील निवडणुकांमध्ये सर्वसाधारण प्रभागांतून काही ठिकाणी नामाप्र उमेदवार निवडणूक लढवत आहेत आणि या सर्व १३ प्रभागांतील नामाप्र मतदारदेखील मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक आयोगाने नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या आरक्षित प्रभागांतील निवडणुका रद्द केल्याने प्रभाग २ मध्ये कल्पेश मोहिते, मनोज प्रजापती, सुरेश पवार, लहू पवार आणि संभाजी माने तसेच प्रभाग ८ मध्ये रिमा बुरुणकर आणि अनिता जांभळेकर, प्रभाग १० मध्ये शुभांगी चव्हाण, संगिता इंगवले, प्रज्ञा सुर्वे, सायली सलागरे, प्रभाग १४ मध्ये निलेश सुतार, अंकिता जांभळेकर आणि प्रकाश भुतकर आदी १४ नामाप्र उमेदवारांचे अर्ज वैध ठरूनही ते सर्व रिंगणाबाहेर गेले आहेत. याच ४ प्रभागांमधील मतदारांदेखील मतदानाचे कर्तव्य बजावण्यापासून वंचित ठेवण्यात येणार आहेत. प्रभाग २ मध्ये १९४ महिला आणि १८६ पुरुष असे ३८० मतदार, प्रभाग ८ मध्ये १७५ पुरुष आणि १७४ महिला असे ३४९ मतदार, प्रभाग १० मध्ये १४३ पुरुष आणि १४४ महिला असे २८७ मतदार आणि प्रभाग १४ मधील ६५ पुरुष आणि ७१ महिला असे १३६ मतदार वंचित राहणार आहेत. या ४ प्रभागांतील एकूण ५६९ पुरुष आणि ५८३ महिला असे १ हजार १५२ मतदार या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये १४ उमेदवारांप्रमाणेच अलिप्त ठेवले जाणार आहेत.
पोलादपूर नगरपंचायतीच्या १३ प्रभागांमधील सर्वसाधारण आरक्षणाच्या प्रभागातून शिवसेनेकडून नागेश पवार, सुरेश पवार, रिमा बुरुणकर, मनसेतर्फे प्रज्ञा सुर्वे, काँग्रेसतर्फे श्रावणी शहा, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित खेडेकर, भाजपकडून रश्मी दीक्षित हे इतर मागासवर्गीय जातींचे उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी लढवत आहेत.
भाजपची भूमिका निर्णायक
भाजपची भूमिका सर्वच प्रभागांमध्ये निर्णायक ठरणार असून शिवसेनेला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेस मतदानाचा कौलच ठरवणार असून मनसेकडूनही कोणाची पाठराखण केली जाईल, हे अद्याप निश्चित चित्र स्पष्ट दिसून येत नाही.
अर्ज मागे न घेण्याची खेळी?
दरम्यान, पोलादपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात आघाडी झाली असूनही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत कोणताही दगाफटका होऊन मागीलवेळी काँग्रेस, शेकापक्ष व मनसे आघाडीतील शेकापक्षाच्या उमेदवाराने परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उमेश सुतार बिनविरोध निवडून आले होते; त्याची पुनरावृत्ती घडू नये यासाठी १३ डिसेंबरपर्यंत काँग्रेसकडून प्रभाग ५,१३,१५ आणि १६ मधील उमेदवारी अर्ज मागे न घेण्याची सावध खेळी खेळण्यात आली आहे.
यांचे अर्ज ठरले अवैध
बुधवारी झालेल्या छाननीमध्ये काँग्रेस पक्षाचे शर्मिला दुदुस्कर, प्रियांका नांदगांवकर, शुभांगी भुवड, सारिका विचारे, समीरा महाडीक, मदार शेख आणि शुभांगी भुवड तर शिवसेनेचे स्वाती दरेकर, कल्पना सवादकर, निलिमा सुतार, रिया मोरे, प्रशांत आंब्राळे, प्रकाश गायकवाड आणि मनसेचे संदेश सुतार आणि अभासेनेच्या कोमल महेंद्र जाधव आदी १५ जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले.