
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची बैठक झाल्यानंतर पालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत.
सध्या मुंबईत अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. कोरोना काळातील निर्बंध शिथिल होऊ लागल्यानंतर देखील यात भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्हीडिओ कॉन्फरन्िसंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत पालिका आयुक्तांच्या झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. मुंबईतील रस्ते दुरुस्ती कामांची निविदा प्रक्रिया व्यवस्थितपणे आणि पारदर्शक पद्धतीने करा. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम प्राधान्याने पूर्ण झाले पाहिजे, त्यासाठी कालमर्यादा ठरवून द्या, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
रस्ते, पदपथ, दुभाजक, रस्त्यांच्या कडेचे कठडे, बागा-उद्याने सुंदर आणि व्यवस्थित असतील हे पाहण्याचे काम आपले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पूर्व आणि पश्चिम महामार्गांलगत मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे, याठिकाणी कॅमेरे लावून हे डेब्रिज टाकणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर पालिका आयुक्तांनी तात्काळ कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
तसेच पालिकेच्या सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई अधिक प्रभावीपणे सुरू करावी. तसेच कोणताही दबाव आला तरी मागे हटू नये, असेही आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार पालिकेच्या २४ विभागांत सहाययक आयुक्त कारवाईला सुरवात करणार आहेत.