
बोईसर (वार्ताहर) : शहरात मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोकाट जनावरांना लगाम लावणारी कुठलीही यंत्रणा बोईसरमध्ये नाही. या मोकाट जनावरांच्या टोळ्या दिवसभर गावात, तर रात्री परिसरातील शेतात धिंगाणा घालत असतात. या समस्येवर कोणीही लक्ष देत नाही. या समस्येकडे लक्ष देऊन मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
बोईसरमध्ये दिवसेंदिवस मोकाट जनावरांची समस्या गंभीर होत आहे. जनावरांच्या संख्येत वाढ झाली आहे. मोकाट जनावरांना लगाम घालणारी कुठलीही यंत्रणा या भागात नाही. पूर्वी प्रत्येक ग्रामपंचायतींतर्गत कोंडवाडे असायचे, मात्र आता एकही कोंडवाडा दिसून येत नाही. शहरासह ग्रामीण भागातील गाव-खेड्यातील कोंडवाडेच गायब झाल्याने जनावरे कोंडल्याचे गेल्या दोन-तीन वर्षांत ऐकिवात नाही, परिणामी मोकाट जनावरे आणि कुणी पाळीव जनावरांचे मालक असलेच तेदेखील बिनधास्त झाले आहेत.
राष्ट्रीय महामार्गापासून शहरातील गल्लीबोळात जनावरांच्या टोळ्या दिवसभर फिरत असतात. रस्त्यावर आडवे बसलेली जनावरे रहदारी ठप्प करतात. वाहनधारकाला जनावराला हुसकावून लावून रस्ता मोकळा करावा लागत असल्याचे प्रकार पाहावयास मिळतात. रहदारी ठप्प करणाऱ्या या प्रकाराविरोधात कुणी तक्रार करत नाही किंवा कोणी स्वत:हून यावर उपाय करत नाही. दिवसभर गावातून जाणाऱ्या मोकाट जनावरांचा रात्री परिसरातील शेतात तळ असतो. परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी मोकाट जनावरे करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
निवेदन देण्यास कोणीही पुढे येईना
दिवसभर शहरात राहणाऱ्या मोकाट जनावरांच्या टोळ्या रात्र झाली की निघून शेताकडे प्रस्थान करतात. ५० पेक्षा जास्त जनावरे एका टोळीत दिसून येत आहेत. शहरात मोकाट जनावरे मोठ्या संख्येने रात्री व दिवसा दिसतात. एवढा कहर झाला असूनही अद्याप संबधित प्रशासन याकडे लक्ष देत नाही, हे विशेष. नागरिकही या प्रकाराची तक्रार करताना आढळत नाहीत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असेच शेतकरी कधी निवेदन देण्यास पुढे येतात. निवेदन दिले तरी कोणी त्याची दखल घेण्याची तयारी दाखवत नाहीत, तशी दखलही नाही. परिणामी जसे आहे, तसेच चालू द्या, अशी अवस्था सध्यातरी बघावयास मिळत आहे.