
मुंबई : मुंबईत ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात बड्या कलाकारांसह अनेकांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून ड्रग्ज सप्लायर्सच्या विरोधात विशेष मोहिम चालवली जात आहे. या मोहिमेंतर्गत मुंबईतील एका महिलेकडून सात किलो हेरॉईन जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली. ही महिला मुंबईतील टॉप ड्रग्ज पेडलर्सपैकी एक असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत ड्रग्ज पुरवणाऱ्यांचे रॅकेट समोर आले असून अटक करण्यात आलेली महिला गेल्या १० वर्षापासून ड्रग्ज सप्लायर्सचा धंदा करत आहे. आत्तापर्यंत ड्रग्जची आठ प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणांतून एकूण १६ किलो हेरॉईन जप्त करण्यात आला असून यापैकी तीन जणांना राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत २१ कोटी रुपये इतकी आहे, असे दत्ता नलावडे म्हणाले.
मुंबईत ह्युमन कुरिअर्सचा वापर करत ड्रग्जचा प्रवास होत आहे. राजस्थान ते मुंबई अशी ड्रग्ज सप्लायर्सची साखळी असून या तपासात तीघांची नावे समोर आली आहेत. क्राईम ब्रांचच्या युनिट ७ने सेक्स टुरिझमचा भंडाफोड केला असून दोन व्यक्तिंना अटक करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.