
कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील अनधिकृत वाळू उत्खनन होणाऱ्या सोनवडे, वालावल व कवठी येथील सुमारे ३९ रॅम्प कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी उद्ध्वस्त केले. एकाच वेळी एवढे रॅम्प उद्ध्वस्त करण्याची कुडाळ तालुक्यातील पहिलीच घटना आहे.
कुडाळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उत्खनन सुरू आहे. राजरोसपणे अनधिकृत वाळू वाहतूक करणारे डंपर गोव्याच्या दिशेने जात असतात मात्र कोणतेही प्रशासन कारवाई करताना दिसत नाही. तथापि, कुडाळ तालुका तहसीलदार अमोल पाठक यांनी तालुक्यातील अनधिकृत वाळू उपसा होणाऱ्या सोनवडे, वालावल व कवठी या गावांमध्ये असलेले अनधिकृत रॅम्पवर सोमवारी एकाच दिवशी कारवाई केली. ही कारवाई दिवसभर सुरू होती.
यामध्ये सोनवडे येथील १४ रॅम्प, वालावल येथील १२ रॅम्प, कवठी येथील १३ रॅम्प नष्ट करण्यात आले आहेत. तहसीलदार अमोल पाठक यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, आता हे रॅम्प उद्ध्वस्त केले आहेत. पुढील कारवाई ही होड्यांवर केली जाईल. अनधिकृत वाळू उत्खनन सुरू आहे ते बंद करण्यासाठी प्रयत्न केले जातील.