Monday, May 12, 2025

महामुंबईठाणे

मांडीवर थापले जाते समोशाचे पीठ

मांडीवर थापले जाते समोशाचे पीठ

कल्याण (वार्ताहर) : कल्याण पूर्वे येथे एका ठिकाणी किळसवाण्या पद्धतीने, स्वच्छता धाब्यावर बसवत समोसे तयार केले जात असल्याचे समोर आले आहे. कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरातील शंकर हॉटेलमध्ये चक्क समोसाचे पीठ घामाने माखलेल्या मांडीवर मारले आणि थापले जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर विक्रेते स्वच्छतेशी प्रतारणा करत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याचे वास्तव समोर आले आहे. हा व्हिडिओ पाहताच नागरिकांनी संताप आणि घृणा व्यक्त केली आहे.

रविवारी मराठी एकीकरण समिती,महाराष्ट्र राज्य यांची वार्षिक बैठक ही कल्याण पूर्व येथील काटेमानिवली येथे आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीनंतर जमलेल्या सदस्यांना अल्पोपहार म्हणून समोसा देण्यासाठी मराठी एकीकरण समितीचे कल्याण शहर समनव्यक हे काटेमानिवली येथील शंकर हॉटेल ह्यांना समोस्याची ऑर्डर देण्यासाठी गेले होते. पण हॉटेल मधील संबंधित कामगार हे समोसा बनवण्यासाठी लागणाऱ्या पुऱ्या ह्या लाटून दुसऱ्या कामगाराच्या घामाने माखलेल्या मांडीवर ठेवत असताना गलिच्छ चित्र हे भूषण पवार ह्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने सांगितलेली समोस्याची ऑर्डर ही रद्द करून संबंधित किळसवाण्या प्रकरणाचे चित्रीकरण केले आणि संबंधित प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी सदर चित्रीकरण हे सामाजिक माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवले.

जर अश्या प्रकारे खाद्य पदार्थ पध्दतीने बनवून लोकांच्या आरोग्याशी संबंधित हॉटेल चालक खेळत असतील तर अशा हॉटेल चालकांकडे खाद्य परवाना कसा आला? खाद्य परवाना नसेल तर कोणाच्या आशीर्वादाने ही अनधिकृत दुकाने, हॉटेल शहरात चालू आहे, याचे उत्तर हे प्रशासनाने द्यावे. तसेच अशा गलिच्छ पद्धतीने पदार्थ विकून संबंधित हॉटेल चालकावर कारावाई करण्याची मागणी ही मराठी एकीकरण समितीचे कल्याण शहर समनव्यक ह्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाला केली आहे. त्यावर लवकरच लेखी तक्रार ही अन्न आणि औषध प्रशासन ह्यांना करणार आहोत अशी माहिती गणेश तिखंडे आणि भूषण राजेंद्र पवार ह्यांनी दिली.

Comments
Add Comment