
मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीपासून मुंबईतील प्रसिद्ध जिजामाता उद्यान म्हणजे राणीबागे खुले होत आहे. यामुळे बच्चे कंपनीसाठी ही दिवाळी खास असणार आहे. मात्र शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून राणीबागमध्ये फिरावे लागणार आहे. तर नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे राणीबाग प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.
फेब्रुवारी महिन्यात राणी बाग सुरू करण्यात आली. मात्र लोकांची गर्दी पाहता तसेच पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर ५ एप्रिलपासून उद्यान पर्यटकांसाठी पुन्हा बंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने राणीबाग नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा आराखडा तयार करण्यात आल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.
राणीबाग सुरू करण्याचा निर्णय घेत प्रशासनाकडून कोरोना खबरदारीसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याबाबत आराखडाही तयार करण्यात आला आहे. यात मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. कोरोना लसीची अट घालण्यात आलेली नसली तरी गर्दी वाढल्यास गेट बंद करण्यात येईल, गर्दीवर नियंत्रण आणि पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी ४० सुरक्षा रक्षकांची टीम तैनात केली जाईल. जागोजागी सॅनिटायझरची व्यवस्था केली जाईल. प्राण्यांचे निवासस्थान ग्लासने बंदिस्त असल्याने निकट संपर्क टळणार असून मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. तसेच दोन डोस घेतलेले असल्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.