
वाडा (वार्ताहर) : वाडा तालुक्यात चार पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने पिकांना मोठा दणका बसला आहे. हस्त नक्षत्रातील पाऊस मेघ गजनासह पडत असल्याने कापणीला आलेले भातपीक पावसाच्या तडाख्याने जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक पाण्यात गेल्याने बळीराजाचा सुखाचा घास हिरावला आहे.
पावसामुळे झोपलेल्या भातशेतीकडे पाहून शेतकऱ्यांना मात्र गहिवरून येत आहे. त्यामुळे या भाताची कापणी करावी कशी? असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. हाती आलेले पीक पावसाने हिरावून घेतल्याने वषर्भर मेहनत करून भरघोस आलेले भाताचे पीक पावसामुळे वाया जात असल्याने शेती पीकवावी की नाही. असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करू लागला आहे. कापणीला आलेले भात जमीदोस्त झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. मजुरीच्या वाढत्या दरामूळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
गेल्या दोन वर्षांप्रमाणेच या वर्षीही पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांची भात कापणी लवकरात लवकर करण्याकडे कल आहे. पण मजूर मिळेनासे झाले असून उपलब्ध असलेल्यांचा मजूरीचा भावही चांगलाच वधारला असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. पावसाचा वाढलेला धोका पाहता मजूरी वाढीसाठी अडून बसलेल्या मजुरांना विनंत्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.