
सोनू शिंदे
उल्हासनगर : दिवाळीचा सण तोंडावर आला असतानाच उल्हासनगरात वर्दळीच्या बाजारपेठेत फटाके विक्रेत्यांकडे लायसन्सच नसल्याचा धक्कादायक प्रकार पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाला आहे. लायसन्स नसलेल्या या दुकानांना पालिकेने नोटीस बजावली आहे.
दिवाळीपूर्वी फटाक्यांच्या दुकानाचे लायसन्स,आग प्रतिबंधक यंत्रणा आहे की नाही, याचे सर्वेक्षण करण्यासाठी पालिकेचे मुख्यालय उपआयुक्त अशोक नाईकवाडे, अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी बाळू नेटके, उपअधिकारी कुशवाह यांनी कॅम्प नंबर २ मधील वर्दळीच्या नेहरू चौकात असलेल्या ३ आणि कॅम्प नंबर ४ भाजी मार्केटमध्ये असणाऱ्या एका फटाके विक्री करणाऱ्या दुकानाचे सर्वेक्षण केले. तेव्हा त्याच्याकडे लायसन्स नसल्याची बाब उघडकीस आली असून एकाकडे आग प्रतिबंधक यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या ४ फटाके विक्रीच्या दुकानांना तडकाफडकी नोटीस बजावण्यात आल्याचे मुख्यालय उपआयुक्त अशोक नाईकवाडे यांनी सांगितले.
लायसन्स आणि आग प्रतिबंधक यंत्रणा नसणे म्हणजे नागरिकांच्या जिवाशी खेळ असून तो खपवून घेतला जाणार नाही. लायसन्स तत्काळ काढले नाही तर ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार, असा इशारा देखील नाईकवाडे यांनी दिला आहे.