स्त्रियांच्या लेखणीतून साकारलेली आत्मकथने

Share
  • मायभाषा: डॉ. वीणा सानेकर

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या हातात लेखणी उशिराच आली. व्यक्ती म्हणून स्त्रीचे स्वतंत्र व्यक्तिमत्व समाजाने मान्य करण्याच्या प्रवासात स्त्रीला खूप सोसावे लागले. स्त्रीही माणूस आहे, ही जाणीव समाजाला व्हावी म्हणून तिने आपल्या लेखणीतून आग्रह धरला. तिच्या आत्मकथनांमधून तिने जीवनाचा व जगण्याचा अर्थ व्यक्त केला. मराठी साहित्यातील ही आत्मकथने हे आपल्या भाषेचे वैभव आहे.

रमाबाई रानडे यांनी लिहिलेल्या आठवणी, आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण, पार्वतीबाई आठवले यांची माझी कहाणी, कमलाबाई देशपांडे यांचे ‘स्मरणसाखळी’ ही एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभिक काळातील काही आत्मकथने. अतिशय सहजसुंदर शैलीतील स्मृतिचित्रे हे लक्ष्मीबाई टिळक यांचे आत्मकथन वाचणे हे नेहमीच आनंददायक ठरते. रेव्हरंड टिळक यांच्याबरोबरचा संसार करताना आयुष्यात आलेले चढ-उतार या आत्मकथनात दिसतात. एककल्ली, काहीसा दुराग्रही पती त्यांच्या वाट्याला आलेला. पण अनेक वेळा आपल्या विनोदबुद्धीने त्यांनी कठीण प्रसंगातही निभावून नेले.

समाजाच्या सेवेला वाहून घेतलेली, एका हिमालयाची सावली ‘माझे पुराण’मध्ये दिसते. बाया कर्वे अर्थात आनंदीबाई म्हणजे धोंडो केशव कर्वे यांची पत्नी! महर्षी कर्वे यांच्यासोबतचे सहजीवन सोपे नव्हते. पण बायाने ते सोपे करून उलगडले. स्वातंत्र्योत्तर काळाकडे वळले असताना आनंदीबाई शिर्के यांचे सांजवात हे आत्मचरित्र आठवते. कलावंत स्त्रियांची आत्मकथने हा स्वतंत्र विषय ठरतो. दुर्गा खोटे, शांता हुबळीकर, लीला चिटणीस, लालन सारंग, जयश्री गडकर, स्नेहप्रभा प्रधान यांनी आत्मचरित्रे लिहिली आहेत. सांगत्ये ऐका, आता कशाला उद्याची बात, जगले जशी, चंदेरी दुनियेत, स्नेहांकिता, अशी मी जयश्री ही आत्मकथने चंदेरी दुनियेत जगणाऱ्या स्त्रियांची प्रतिबिंबे ठरतात.

लेखकांच्या व कलावंतांच्या पत्नींनी लिहिलेली आत्मकथने म्हणून सुनिता देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी’, माधवी देसाई यांचे ‘नाच गं घुमा’, यशोदा पाडगावकर यांचे ‘कुणास्तव कुणीतरी’, कांचन घाणेकर यांचे ‘नाथ हा माझा’ ही पुस्तके आवर्जून आठवतात. पतीच्या कर्तृत्वाने त्यांच्या अर्धांगिनीची आयुष्यं झाकोळून गेली तरी त्यांचे अंगभूत तेज लपत नाही. दोन तेजस्विनींची आत्मकथने आवर्जून नोंदवावी, अशी आहेत. आदिवासी समाजाला जागविणाऱ्या गोदावरी परुळेकर यांचे ‘जेव्हा माणूस जागा होतो’, शिक्षणक्षेत्रात मूलभूत कामगिरी करणाऱ्या अनुताई वाघ यांचे ‘कोसबाडच्या टेकडीवरून’, साधनाताई आमटे यांचे ‘समिधा’ या आत्मचरित्रांचा अवकाश समाजभानाने व्यापलेला आहे.

यांची आयुष्येच समाजाला अर्पण केलेली होती. बाबा आमटे यांनी प्रज्वलित केलेल्या यज्ञात साधनाताई किती निर्लेपपणे समिधा झाल्या, हे समजून घेण्यासारखे आहे. दलित आत्मकथने हे पुन्हा आणखी एक दालन. मल्लिका अमरशेख यांचे ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’, शांताबाई कांबळे यांचे ‘माझ्या जन्माची चित्तरकथा’, ऊर्मिला पवार यांचे ‘आयदान’ ही आत्मकथने नोंदवण्याजोगी. जातीव्यवस्थेने दिलेल्या वेदना आणि स्त्री म्हणून सोसाव्या लागलेल्या वेदना यांचे ताणेबाणे या आत्मकथनांतून साकारले.

प्रख्यात उर्दू लेखिका अमृता प्रीतम यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, “मृत्यूनंतर माझ्या शेजारी माझी लेखणी ठेवा.” स्त्रीच्या व्यथा-वेदनांना, सुख-दु:खांना लेखणीने मुखर केले. येणाऱ्या महिला दिनानिमित्ताने स्त्रियांच्या लेखणीला नि शब्दांना सलाम!

Recent Posts

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

3 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

6 hours ago

अवयवदान प्रबोधनाची चळवळ

कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…

7 hours ago

आरोग्य विम्यासाठी वयाची अट काढली, पण…

अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत मागच्या महिन्यात एक महत्त्वाची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली, ती म्हणजे…

7 hours ago

पहिल्या चार टप्प्यातच झालाय महाविकास आघाडीचा सुपडा साफ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा मुंबई : महाराष्ट्रात चार चरणांच्या निवडणूक पूर्ण झाल्या आहेत. २०…

10 hours ago