मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. पण खरा प्रश्न असा आहे की, ही घोषणा आहे की नेहमीसारखं आश्वासन? २०२२ मध्येही अशीच योजना आली होती, पण कागदांवरच विरून गेली. मग यावेळी काय वेगळं घडणार?
गोयल म्हणाले, “उत्तर मुंबईतील ११ तलाव अतिक्रमणांमुळे नामशेष झाले आहेत. पण पुढील दोन वर्षांत हे तलाव पुन्हा जिवंत केले जातील आणि सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून लोकांसाठी खुले केले जातील.” या योजनेत मालवणीतील लोटस तलाव, गोराईतील सुमलई तलाव, मढमधील वानाला, पोसाई, हरबादेवी, धारवली तलाव आणि मनोरीमधील कजरादेवी तलाव यांचा समावेश आहे.
महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, उपआयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली यावर्षीच्या सुरुवातीलाच या तलावांची पाहणी करून एक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, या प्रकारच्या प्रकल्पात स्थानिक नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण दीर्घकालीन देखभालीसाठी जनतेचा विश्वास आणि सहभाग गरजेचा आहे.
दोन टप्प्यांत होणार काम
हा संपूर्ण प्रकल्प दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात गर्दीचे प्रमाण जास्त असलेले, किंवा जिथे खर्च आणि गुंतागुंत कमी आहे असे तलाव आधी पुनरुज्जीवित केले जातील. यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित तलावांचे काम हातात घेतले जाईल.
‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेचे संस्थापक शिशिर जोशी यांनी सांगितले की, “आपण अशा तलावांवर आधी लक्ष केंद्रित करू जे लवकर पुनरुज्जीवित करता येतील. उदाहरणार्थ, झाडांची सावली, छोटं अम्फीथिएटर, चांगली लाईट व्यवस्था, यामुळे लोक त्या परिसरात येतील. मात्र गटार आणि स्वच्छतेसारख्या प्रश्नांसाठी पालिकेने पूर्णपणे पुढे यावे लागेल.”
योजनेत याआधी अपयश का आलं?
२०२२ मध्येही पालिकेच्या पी उत्तर विभागात १८ तलावांचा विकास करण्याचा प्रस्ताव होता. पण तो प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही. मात्र यावेळी खासदार स्वतः पुढे आल्यामुळे, अधिकाऱ्यांना दोन वर्षांचा ठराविक कालावधी देण्यात आला आहे.
दरम्यान, पुनरुज्जीवन ही केवळ स्थापत्य नव्हे, तर लोकांच्या आठवणी, निसर्गाशी नातं आणि सांस्कृतिक जडणघडण पुन्हा उभी करण्याची संधी आहे. मात्र, प्रश्न एकच आहे. यावेळी खरंच हे घडणार का? की पुन्हा एकदा तलावांचं नशीब फक्त फाइलींमध्येच अडकून राहील?