पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणाऱ्या तीन नेत्यांच्या संभाव्य नव्या आघाडीने राज्यातील विरोधी राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण केली आहे. महादेव जानकर, बच्चू कडू आणि राजू शेट्टी हे तीन बडे नेते २० एप्रिल रोजी पुण्यात एकत्र येणार असून, त्या दिवशीच या नव्या आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
युवा संघर्ष निर्धार परिषदेत रणशिंगाचा पहिला हुंकार
जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील फुले वाड्याजवळील सभागृहात आयोजित ‘युवा संघर्ष निर्धार परिषद’ या कार्यक्रमात तीनही नेते एकत्र येणार आहेत. त्यामुळे यावेळी नव्या राजकीय आघाडीचा औपचारिक उदय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Breaking News : मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ ७ महत्त्वाचे निर्णय
महाविकास आघाडी निष्प्रभ – नव्या पर्यायाची गरज
राज्यात महायुतीला विधानसभेत मोठे संख्याबळ मिळाल्याने महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि राष्ट्रवादीची धार कमी झाली आहे. विरोधकांची स्पेस भरून काढण्यासाठी ठाम आणि आक्रमक नेतृत्वाची गरज निर्माण झाली आहे. हाच निर्वात भरून काढण्यासाठी या तिन्ही नेत्यांनी एकत्र यायचं ठरवलं असल्याचं बोललं जातंय.
तिघांची ताकद – एकत्रित मतपेढीचा हिशेब
-
महादेव जानकर – राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून ओबीसी व धनगर समाजाचे नेतृत्व
-
बच्चू कडू – विदर्भात लोकप्रिय, आक्रमक स्टाईलमुळे ओळख
-
राजू शेट्टी – शेतकऱ्यांचा आधारस्तंभ, ग्रामीण भागात प्रभाव
या तिघांची मतपेढी स्वतंत्र असली तरी मिळून लढल्यास ग्रामीण आणि ओबीसी मतदारांमध्ये मोठा प्रभाव टाकू शकतात.
माजी मित्रांपासून नाराजी – आता नवा प्रयोग
-
जानकर भाजपपासून नाराज
-
बच्चू कडू शिंदे गटावर नाराज
-
राजू शेट्टी यांची पूर्वीची आघाडी अपयशी
या पार्श्वभूमीवर ‘दुखावलेले नेते – नव्या भूमिकेत’ अशी प्रतिमा जनतेसमोर तयार होत आहे. यामुळे जनमानसात नवीन पर्याय मिळेल, अशी शक्यता काहींच्या मते आहे.
परिषदेमध्ये होणार ‘गोपनीयतेचं’ उघड – महाराष्ट्राचं लक्ष पुण्याकडे
ही आघाडी निवडणुकीच्या आधीचा शक्तिप्रदर्शनाचा भाग की खरोखरच एक पर्यायी राजकीय आघाडी निर्माण होणार? याबाबत उत्सुकता आहे. तीनही नेत्यांचे भाषण हे या नवी राजकीय समीकरणाचा दिशादर्शक ठरणार आहे.
दरम्यान, पारंपरिक पक्षांच्या तोचतोचपणाला कंटाळलेल्या मतदाराला ही नवी आघाडी कितपत भावते आणि ही तिघांची जोडी राजकारणात किती भुसभुशीत वाळू ठरते हे आगामी निवडणुकांत स्पष्ट होईल. तूर्तास, महाराष्ट्रातील राजकीय नेपथ्यावर हे तीन भिडू उतरायला सज्ज आहेत.