Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Goa Highway : स्कूटर-टेम्पोच्या धडकेत वडिलांचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

Mumbai Goa Highway : स्कूटर-टेम्पोच्या धडकेत वडिलांचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलादपूरमध्ये अपघाताची पुनरावृत्ती

पोलादपूर (रायगड) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची पुनरावृत्ती झाली असून, यामध्ये एका कुटुंबातील पिता जागीच ठार तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना पोलादपूर शहरालगत लोहारमाळ मोरया ढाब्याजवळ बुधवारी रात्री १०.१५ च्या सुमारास घडली. या अपघातामुळे जत्रोत्सवात दु:खाचे सावट पसरले आहे.

घटनाक्रम: चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची थरकाप उडवणारी धडक

पोलादपूरमधील सुनील सुरेश पवार (४१) हे आपली पत्नी सुवर्णा (३९), मुलगा श्लोक (१३) आणि मुलगी रिया (१०) यांच्यासोबत ऍक्टिव्हा स्कूटरवरून प्रवास करत असताना, मागून येणाऱ्या आयशर टेम्पोने राँग साईडने ओव्हरटेक करत त्यांच्या स्कूटरला जबर धडक दिली.

Saptashrungi Stampede : सप्तश्रृंगी गडावर चेंगराचेंगरी! गर्दीचे नियोजन हुकले, पोलिसांची तारांबळ

टेम्पो चालक अतुल अजित काळवणकर (३५, मिठबाव, सिंधुदुर्ग) हा एपीएमसी मार्केटमध्ये नाकारलेले आंबे घेऊन परतत होता. त्याने अतिवेग आणि बेफिकिरीने रस्त्याच्या डाव्या बाजूने स्कूटरला ठोकर दिली. या धडकेत स्कूटरवरील चालक सुनील पवार यांचा तोल गेला आणि ते टेम्पोच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच चिरडून मृत्यू झाला.

कुटुंबातील तिघे जखमी – मुलगी रिया गंभीर

या अपघातात रिया पवार गंभीर जखमी झाली असून, तिला कामोठेतील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पत्नी सुवर्णा आणि मुलगा श्लोक यांना किरकोळ जखमा झाल्या असून, त्यांच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांची तत्परता आणि कायदेशीर कारवाई

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस नाईक शिंदे, पो.ह. सर्णेकर आणि स्वप्नील कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर नागरिकांनी मदतीसाठी मोठी गर्दी केली होती.

या प्रकरणी गणेश येरूणकर यांच्या फिर्यादीवरून आयशर चालकावर भा.दं.वि. कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जत्रोत्सवात पुन्हा दु:खाचे सावट

पोलादपूरच्या जत्रोत्सवाच्या काळात काही वर्षांपूर्वी अपघाताची मालिका घडत होती. मात्र, महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे ती थांबली होती. पण या घटनेमुळे त्या काळाची आठवण ताजी झाली आहे आणि जत्रोत्सवात दु:ख व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -