Saturday, April 19, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यमहिला गुन्हेगारीकडे का वळत आहेत?

महिला गुन्हेगारीकडे का वळत आहेत?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

आजकाल आपण अनेक बातम्या अशा स्वरूपाच्या ऐकतोय ज्यामध्ये महिला अगदी सराईत गुन्हेगारासारखं वर्तन करताना दिसत आहेत. अगदी सुशिक्षित, चांगल्या घरातील महिला सुद्धा याला अपवाद नाहीत. वैवाहिक नात्यातील तणावामुळे अथवा इतर कोणत्याही कारणामुळे पतीला जीवे मारणे, प्रियकराच्या मदतीने पतीला, मुलांना संपवणे, महिलांसाठी असलेल्या कायद्याचा गैरवापर करून पतीवर खोट्या केस टाकून त्याला मनस्ताप देऊन, मानसिक खच्चीकरण करून आत्महत्येला प्रवृत्त करणे, सासरच्यांना कायद्याने कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणे आणि अगदी सासरच्या लोकांची हत्या करणे, सुपारी देणे इथपर्यंत महिलांची मजल गेलेली पाहायला मिळते. इतका राग, दुस्वास, चीड, संताप, बदल्याची भावना, क्रूरपणा महिलांमध्ये कुठून का आणि कसा येतोय? ज्या महिलांना आपण कायम माता, माऊली, दयाळू, प्रेमळ, हळवी, भावनाशील, प्रांजल, संस्कारी, सुसंस्कृत मवाळ समजत असतो त्या इतक्या उग्र रूप कसे आणि का धारण करतात.

जरी पतीशी मतभेद असतील, घरच्यांशी पटत नसेल अथवा दुसरं प्रेम प्रकरण असेल, इतर कोणाशी लग्न करायच असेल, आपला संसार करायचा नाहीये हा निर्णय पक्का असेल, पतीपासून विभक्त होऊन लांब राहायचं असेल तरी त्यासाठी कायदेशीर तरतूद असून महिला कायद्याने घटस्फोट घेणे, मुलं हवी असल्यास मुलांच्या ताब्याबद्दल कोर्टातून आदेश घेणे, पतीचा खूपच काही त्रास असल्यास महिला समित्या, पोलीस प्रशासन येथे तक्रार करणे, स्वतःच्या नातेवाईकांना परिस्थिती बद्दल कल्पना देऊन योग्य तो मार्ग काढणे, चांगल्या व्यक्तीचा कायदेशीर सल्ला, समुपदेशन घेणे असे अनेक मार्ग अवलंबू शकतात.

हे सर्व पर्याय सोडून आजकाल महिला कायदा हातात घेऊन नवऱ्याचा, मुलांचा, सासूचा खून करायला सुद्धा घाबरत नाहीत. अनेकदा विवाहबाह्य संबंध हे कारण अशा खूनशी प्रवृत्ती मागे दिसून येते. परक्या पुरुषाबद्दलच आकर्षण, दुसऱ्या पुरुषाच्या सहवासाची, प्रेमाची, त्याच्यासोबत राहण्याची प्रबळ इच्छाशक्ती, त्यासाठी काहीही करायची अमानवी, क्रूर, हिंसक मानसिकता यामुळे जो कोणी अडथळा ठरत आहे किंवा आपल्या प्रेम प्रकरणाच्या मध्ये येत आहे त्याला कायमच संपवून टाकायचं अस टोकाचं पाऊल महिला उचलत आहेत. यासाठी प्रियकराची मदत घेणे, अत्यंत क्रूर पद्धतीने घातपात, खून याचे नियोजन करणे, पुरावे नष्ट करणे यात महिला सक्रिय होत आहेत.

महिलांना कोणताही मानसिक शारीरिक आर्थिक त्रास पतीकडून अथवा सासरच्या लोकांकडून होत असेल तर त्यासाठी अनेक कडक कायदे अस्तित्वात आहेत. विविध मार्गदर्शन, मध्यस्थी करणारे समाजातील प्रतिष्ठित नागरिक, समाज सेवक, सेवाभावी संस्था उपलब्ध आहेत. आपल्या जवळील अशी खूप मानस असतात जे आपल्याला चांगला सल्ला देऊ शकतात; परंतु अशा कोणत्याही स्वरूपाची मदत न घेता, आपला संसार वाचवण्याचा सावरण्याचा प्रयत्न न करता थेट दुसऱ्याच आणि स्वतःच सुद्धा आयुष्य बरबाद करण्याकडे महिलांचा कल वाढतांना दिसतो.

महिलांच्या अशा वागणुकीचे कारण मानवी स्वभाव आणि मानसिक आरोग्य याचा अभ्यास केल्यावर लक्षात येते. मानस शास्त्रानुसार अनेक वर्षांचा ट्रॉमा म्हणजेच सदमा आणि स्वतःचा बचाव करण्याची वृत्ती ही अनेकदा अशा महिलांमध्ये आढळून येते. ज्या महिला भावनिक, मानसिक, शारीरिक पिळवणुकीच्या मोठ्या कालावधीपासून बळी पडलेल्या आहेत. अशा महिला ब्रेकिंग पॉईंटपर्यंत पोहोचलेल्या असतात म्हणजेच त्यांची सहनशक्ती, विचारशक्ती पूर्ण संपलेली खचलेली असते. या महिलांमध्ये मानसिक, शारीरिक, भावनिक अत्याचार सहन करण्याची हिंमत संपलेली असते. आता कितीही काही प्रयत्न केले तरी आपली परिस्थिती बदलू शकत नाही, सुधारू शकत नाही अस त्यांचं ठाम मत झालेलं असत.

या महिलांचे मानसिक आरोग्य खराब कसे होते हे जाणून घेतल्यास लक्षात येते की, अन ट्रीटेड मेंटल हेल्थ कंडिशन म्हणजेच वेळोवेळी उपचार न केले गेलेले मानसिक आजार. डिप्रेशन, नैराश्य, सायकोसिस अशा मानसिक आजारामुळे अथवा त्यावर योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे, कोणीही त्यांच्याकडे त्यावेळी व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे, त्यांना जिव्हाळा, प्रेम, आपुलकीची वागणूक जवळच्या व्यक्तींकडून न मिळाल्यामुळे महिला हिंसेचा मार्ग निवडतात. अशा महिलांना पर्सनॅलिटी डिस ऑर्डर, स्ट्रेस, तणाव, हाताबाहेर गेलेली परिस्थिती यामुळे नैराश्य, राग, चिडचिड, हतबल झाल्याची भावना हिंसक मार्गाकडे जायला प्रवृत्त करते. बदल्याची भावना, राग, अपमान, तिरस्कार, सतत होत आलेली घुसमट, सतत आर्थिक नियंत्रणात राहणे, पारिवारिक पिळवणूक, कौटुंबिक नात्यात होणारी फसवणूक, अनेक बंधन यामुळे अशा भावना खूप वाढतात आणि तिरस्काराची भावना जास्त तीव्र होऊन महिला असे कृत्य करतात.

पितृसत्ताक, पुरुष प्रधान संस्कृती आणि घरामधील दबावाचे वातावरण यामुळे आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी अनेकदा हिंसेचा मार्गच योग्य आहे असे वाटायला लागते. आपण सगळ्यांना कायमच संपवलं म्हणजेच आपल्याला प्रेम, स्वातंत्र्य, पैसा, मनासारखं जगणं, आपली स्वप्न पूर्ण करणं, आपल्या इच्छेनुसार सगळं करणं शक्य होईल अशी यांची धारणा होते. ही धारणा इतकी प्रबळ असते की त्या पुढे याचे परिणाम काय होतील, आपल्याला आपल्या घरातील लोकांना किती त्रासाला सामोरं जावं लागेल, कायद्याने शिक्षा भोगावी लागेल या सगळ्याचा त्यांना विसर पडतो.

अनेकदा सासरच्या टॉक्सिक नात्यांमध्ये असताना महिलांना त्यांच्या माहेरातून, मित्र-मैत्रिणींमधून, सहकारी यांच्यामधून पण लांब केले जाऊन एकटे पाडले जाते. कोणीही या महिलांना मदत करायला, मार्गदर्शन करायला, समजून घ्यायला आणि समजावून सांगायला तयार नसते. या महिलांमधील आत्मविश्वासाचे खूप खच्चीकरण करण्यात येते यामुळे मानसिकरीत्या जखडल्याची भावना उदयाला येते जिथे हिंसा हा ऐकच मार्ग आहे या पेचातून सुटण्यासाठी अशी भूमिका घेतली जाते.

काही काही ठिकाणी सामाजिक अपेक्षांमुळे जसे की वर्षानुवर्षे कुटुंबाचा मान जपणे, अपमान सहन करत राहणे, अत्याचाराविरुद्ध आवाज न उठवणे, सतत भावनिक दबलेल्या अवस्थेत असणे, कुठलीच मोकळीक नसणे, सतत त्याग, अॅडजेस्टमेंट करावी लागणे, सतत कोणाची बोलणे खावी लागणे, टोमणे सहन करणे, टॉर्चर होणे, कायम माघार घ्यावी लागणे यामुळे महिला विकृत होऊ शकतात. त्यामुळे त्यांची हिंसेचा मार्ग निवडून परिस्थिती बाहेर पडण्याची शक्यता वाढते.

आजकाल समाज माध्यमातून दिसणार इतरांचं आयुष्य आपण तुलना करतो, इतर महिलांना मिळणारी सुखसुविधा स्वातंत्र्य प्रेम पाहून अशा विचित्र परिस्थितीमधून जाणाऱ्या महिला अधिकाधिक दुखावल्या जातात. त्या सतत मनात कुढत असतात, प्रेम, सहवास, आदर, शारीरिक जवळीक शोधत असतात. अशावेळी आपला नवरा, सासर हे नातं किंवा पोटची मुलं हे नातेसंबंध त्यांना तितके महत्त्वाचे वाटेनासे होतात. आपलं आयुष्य आपण कधी जगायचं? आपल्या इच्छा कधी पूर्ण करायच्या की याच सगळ्यांना किंमत देत बसायचं, मीच रोजरोज हाच स्ट्रगल करायचा का? मी किती मन मारून जगायचं? अशा प्रश्नांना काहीही उत्तर सापडत नसल्याने शेवटी एक घाव दोन तुकडे करण्याकरिता त्या तयार होतात, आक्रमक होतात आणि नको ते बेकायदेशीर कृत्य करून बसतात.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -