Saturday, April 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजBMC : मुंबईतील ३२१ विहिर आणि पाणी भरणा केंद्र रडारवर

BMC : मुंबईतील ३२१ विहिर आणि पाणी भरणा केंद्र रडारवर

मुंबई महापालिकेने परवानगी रद्द करण्याची मोहिम घेतली हाती

पाच वर्षांपासून सीजीडब्ल्यूएचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यास चालढकल

विहिर मालकांसह अनधिकृत विहिरींवर कारवाई

मुंबई : मुंबईत मोठ्याप्रमाणात विहिरींमधून पाण्याचा उपसा केला जात असल्याने भूजलाची पातळी घटत चालली आहे, याबाबत भीती वर्तवली जात असतानाच मागील तीन वर्षांपासून विहिरी मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची (सीजीडब्ल्यूए) परवानगी सादर करता न आल्याने आता मुंबईतील विहिर आणि कुपनलिकांच्या मालकांनाच महापालिकेने नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आजवर टाळाटाळ करून विहिर मालकांना हाताशी धरून टँकर माफिया पाण्याची विक्री बेसुमार करत असल्याने त्यांना चापच लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही परवानगी रद्द करण्याबाबत विहिरींच्या मालकांना नोटीस पाठवताच त्याची कळ टँकर मालकांना जावून बसली आहे.

मुंबईतील विहिरी तसेच कुपनलिकांमधून टँकरद्वारे पाण्याची विक्री तथा पुरवठा केला जातो. प्रत्येक विहिर तथा कुपनलिकांमधून प्रत्येकी दोन टँकर अर्थात २० हजार लिटर पाण्याचा उपसा करण्यास परवानगी आहे. या पाण्याचा वापर स्थानिक रहिवाशी सोसायट्यांना करता येवू शकतो. मोठ्या विहिर, कंगण विहिरी तसेच कुपनलिका आदींच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंगची योजना राबवून त्याचा वापर करणे आवश्यक आहे. परंतु अनेक ठिकाणी विहिरींच्या पाण्याचा व्यावसायिक वापर केला जात आहे.

प्रत्येक विहिर तसेच कुपनलिका मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे. त्यानुसार, सन २०२०मध्ये नोटीस देवून विहिर मालकांना सीजीडब्ल्यूएची परवानगी सादर करण्याची सूचना केली होती. परंतु त्यानंतरही कुणीही याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सन २०२१मध्ये पुन्हा नोटीस पाठवली होती. त्यानंतरही याला कुणी विहिर मालकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे सन २०२२मध्ये पुन्हा नोटीस पाठवल्यानंतर त्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्री आणि पालकमंत्री याच्या आदेशानुसार महापालिका आयुक्तांनी मौखिक आदेश देत ही कारवाई थांबवली होती. परंतु आता पुन्हा एकदा ज्या मालकांनी सीजीडब्ल्यएचे ना हरकत प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांची परवानगी रद्द करण्याबाबत नोटीस जारी केल्या आहे. परवानगी रद्द करण्याची प्रक्रिया आता महापालिकेने सुरु केल्यानंतर टँकर मालकांनी याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे.

जपानी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री

महापालिकेच्या किटकनाशक विभागाच्यावतीने या नोटीस जारी करण्यास सुरुवात केली आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत सुमारे ३८५ ठिकाणी टँकरने पाणी भरले जाते. त्यातील ३२१ ठिकाणी टँकरने पाणी भरले जाते त्या विहिरीच्या मालकांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच ज्या विहिरी कुपनलिका अनधिकृतपणे खोदल्या आहेत आणि त्या पाण्याची विक्री टँकरद्वारे केली जात आहे, त्या सर्वांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरु आहे,असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

महापालिका प्रशासन कुठल्याही टँकर मालकांना किंवा चालकांना नोटीस जारी करत नसून महापालिकेच्यावतीने विहिर मालकांना नोटीस जारी केली जात आहे. त्यामुळे विहिरींमधून पाण्याचा उपसा करण्यास नोटीस जारी केल्याने साहजिकच टँकरमध्ये तिथे पाणी भरता येणार नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. विहिर मालकांना सीजीडब्ल्यूएचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे आणि त्यानुसार त्यांनी पाणी टँकरमध्ये भरुन पुरवठा करावा असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सन २०२२ पासून हे प्रकरण सुरु असून पाच वर्षांत एकाही विहिर मालकांना हे प्रमाणपत्र सादर करता आलेले नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्यांनी अशाप्रकारे प्रमाणपत्र सादर केले त्यांना महापालिका परवानगी देत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -