Saturday, April 19, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखरंगणार आयपीएलचा महाथरार!

रंगणार आयपीएलचा महाथरार!

चॅम्पियन ट्रॉफी २०२५ भारतीय क्रिकेट संघाने जिंकल्यापासून भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे. देशांतर्गत क्रिकेट सामने, लीग सामने, अन्य देशांसोबतचे सामने या स्पर्धा नेहमीच आयोजित केल्या जातात. पण अन्य स्पर्धा आणि आयपीएल यामध्ये जमीन-आस्मानाचा फरक आहे. आयपीएलचा महाथरार म्हणजे षटकार-चौकारांची स्फोटक खेळी. कधी कोणाला सूर गवसेल आणि कोण सामना एकहाती फिरवून जाईल, याची शाश्वती आयपीएलमध्ये कोणालाही देता येत नाही. आयपीएल २०२५ बाबत उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. क्रिकेटचे चाहते एक एक दिवस मोजत आहेत. आता आयपीएलला केवळ काही तासच शिल्लक राहिले आहेत.

जगातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठ्या टी-२० लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या सीजनला शनिवार, दि. २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स या मैदानावर २२ मार्च रोजी शुभारंभाचा सामना खेळवला जाईल आणि २५ मे रोजी याच मैदानावर आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामना खेळवण्यात येईल. आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या संघामध्ये केवळ देशातीलच नाही तर परदेशातील खेळाडूंचाही सहभाग असल्याने या स्पर्धेतील प्रत्येक सामना क्रीडाप्रेमींना मेजवानी देणारा असतो. आयपीएल स्पर्धेमुळे केवळ नावाजलेल्या खेळाडूंनाच नाही तर ग्रामीण भागातील खेळाडूंनाही एक चांगले व्यासपीठ उपलब्ध आहे. आयपीएलच्या माध्यमातून अनेक खेळाडू मागील काही वर्षांत प्रकाशझोतामध्ये आले आहेत. त्यांच्या अर्थकारणालाही गती मिळाली आहे. मॅच फिक्सिंगच्या प्रकरणामुळे क्रिकेटकडून दुसरीकडे वळलेला वर्ग आयपीएलच्या सामन्यांमुळे पुन्हा क्रिकेटकडे वळू लागला आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. या हंगामात रॉयल चॅलेजर्स बंगळूरु एका नवीन कर्णधारासह आयपीएल २०२५ मध्ये प्रवेश करत आहे. फ्रँचायझीने रजत पाटीदारकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स हा गतविजेता आहे. यानंतरही संघाने आपला कर्णधार कायम ठेवला नाही. भारतीय संघाबाहेर असलेला अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे संघाची धुरा सांभाळेल. यावर्षी अनेक संघाना आपला नवीन कर्णधार मिळाला हे पाहायला मिळाले. आयपीएल स्पर्धेला २२ मार्चला शुभारंभ होणार असला तरी या स्पर्धेच्या आयोजनासाठी नोव्हेबर २०२४ पासून सुरुवात झाली आहे. २४ आणि २५ नोव्हेबर रोजी आयपीएल २०२५ साठी मेगा लिलाव पार पडला होता. यात जवळपास १८२ खेळाडूंना फ्रेंचायझींनी संघात घेतले. या खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांपासून आयपीएल २०२५ साठी सरावाला सुरुवात केली आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२५ या जगप्रसिद्ध टी-२० लीगसाठी २४ आणि २५ नोव्हेबर रोजी सौदी अरेबिया येथे मेगा ऑक्शन पार पडले. मेगा ऑक्शनमध्ये तब्बल ५७७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यापैकी केवळ १८२ खेळाडू संघांनी विकत घेतले. या खेळाडूंना विकत घेण्यासाठी जवळपास ६३९.१५ कोटी रुपये फ्रेंचायझींनी खर्च केले. यंदाही स्पर्धेत १० संघांचा सहभाग असणार आहे.

या स्पर्धेमुळे केवळ खेळाडूंनाच नाही तर संघमालकांनाही खऱ्या अर्थाने ग्लॅमरस प्राप्त झाले आहे. सुरुवातीच्या काळात मुंबई इंडियन्सच्या संघमालक निता अंबानी यांच्याकडेच फोकस असायचा. अर्थांत त्याला कारणही तसेच होते. त्या एक तर देशातील आघाडीचे उद्योजक मुकेश अंबानी यांच्या त्या पत्नी आहेत. याशिवाय त्या सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक सामन्याला त्यांची उपस्थिती व खेळाडूंशी असलेली मैत्री, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यातील त्यांचा सहभाग यामुळे आयपीएल स्पर्धा म्हटल्यावर नीता अंबानी या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत; परंतु मागील आयपीएल स्पर्धेपासून नीता अंबानी या काहीशा पिछाडीवर पडल्या असून इंडियन प्रीमियर लीगमधील सनरायझर्स हैदराबादच्या संघ मालक असलेल्या काव्या मारन यांचीच जोरदार चर्चा होत असते. काव्या मारन या स्वत: उद्योजिका असून त्या स्वत: प्रत्येक सामन्याला हजर राहून खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात. त्यांच्या सौंदर्याचीही चर्चा होत असून सनरायझर्स हैदराबादचा सामना सुरू असताना कॅमेऱ्याचा अधिक फोकस खेळाडूंपेक्षा काव्या मारन यांच्यावरच अधिक असतो, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. प्रभावी राजकीय आणि उद्योगपती कुटुंबातील सदस्य असूनही काव्या तिच्या खासगी लाईफबद्दल खूप प्रायव्हसी जपते. ती ३२ वर्षांची असून संपूर्ण जग फिरली आहे. मात्र तरीही ती सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही. आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद शिवाय ती ‘साउथ आफ्रिका २० टूर्नामेट’ क्रिकेट लीगमधील ‘सनराइजर्स ईस्टर्न केप’ संघाची मालक आहे. काव्या तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवर तिचे व्हेरिफाईड अकाऊंट नाही. पण सनरायजर्स हैदराबाद संघाच्या फिशियल ट्विटर अकाऊंटवर तिचे संघाशी संवाद साधतानाचे व्हीडिओ आहेत. या आयपीएल स्पर्धेत विविध देशांतील नावाजलेले व स्फोटक खेळासाठी प्रसिद्ध असलेले खेळाडू सहभागी होत असल्याने गोलंदाजांना या स्पर्धेत फारशी चमक दाखविता येत नाही. जेमतेम २० षटकांचा खेळ व त्यातील १२० चेडूंमध्ये प्रत्येक चेडू सीमारेषेबाहेर जावा, ही क्रिकेटप्रेमींची अपेक्षा असते. स्पर्धेत जितकी जास्त चमक दाखवू, तितकी अधिक किंमत आपल्याला आगामी स्पर्धेसाठी मोजली जाईल, हे अर्थकारणाचे गणित डोक्यात ठेऊनच प्रत्येक खेळाडू या स्पर्धेमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी दाखविण्याचा प्रयत्न करत असतो. शनिवारपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेमुळे पुढील दोन महिने क्रिकेटप्रेमींना दर्जेदार सामन्यांचा आस्वाद घ्यावयास मिळणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -