मुंबई : गृहकर्जासाठी एनओसी मिळवताना म्हाडा लॉटरीतील विजेत्यांना वारंवार मुख्यालयाच्या चकरा माराव्या लागतात.त्यामुळे विजेत्यांकडून नाराजी व्यक्त होत होती.मात्र,सोमवारपासून विजेत्यांना तत्काळ एनओसी मिळणार असून विजेत्यांची होणारी धावपळ थांबणार आहे.त्यादृष्टीने म्हाडाने संगणकीय प्रणालीत आवश्यक ते बदल केले आहेत. म्हाडाकडून थेट अर्जदाराच्या बँकेच्या ईमेलवर एनओसी पाठवली जाणार असल्याने पुढील कार्यवाही तत्काळ करणे शक्य होणार आहे. म्हाडाचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. म्हाडा लाॅटरीत घर लागले तर विजेत्याला सुरुवातीला २५ टक्के रक्कम भरावी लागते. त्यानंतर उर्वरित रक्कम भरण्यासाठी बॅंकेकडून कर्ज मिळावे यासाठी विजेत्यांना म्हाडाची एनओसी घ्यावी लागते. ही एनओसी मिळवण्यासाठी म्हाडाकडे रितसर अर्ज केल्यानंतर १५ दिवसांचा कालावधी लागतो. विजेत्यांनी म्हाडाकडे एनओसीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ती तत्काळ देता यावी म्हणून म्हाडाने आपल्या सिस्टममध्ये बदल केले आहेत. यामुळे आता लॉटरी विजेत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
MHADA : लॉटरी विजेत्यांना गृहकर्जासाठी मिळणार तात्काळ एनओसी, म्हाडाने दिला दिलासा
