नागपूर : नागपूर दंगल प्रकरणी पोलिसानी धरपकड सुरू केली आहे. दंगलीचा सूत्रधार फहीम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी नागपुरात झालेल्या दंगलीमागे फहीम शमीम खान या व्यक्तीचा हात आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये फहीम खानने जमाव जमवल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा (एमडीपी) शहराध्यक्ष आहे.
नागपूर पोलिसांनी दंगल प्रकरणी ५१ जणांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये फहीम खानचे नाव आघाडीवर आहे. त्यानेच सोमवारी १७ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ३० ते ४० जणांना जमा केले होते. त्यानंतर त्यानेच पोलिसांना विहिंप आणि बजरंग दलाविरोधात निवेदन दिले. पोलिसांनी याबाबत गुन्हाही दाखल केला होता. मात्र, संध्याकाळी फहीम खानने पुन्हा जमाव जमवला आणि तणाव निर्माण केल्याचा आरोप आहे. या दंगलीत फहीम खान मास्टरमाईंड असल्याचा आरोप आहे. फहीम खानवर नागपुरात हिंसा भडकवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. लोकांना हिंसेसाठी चिथावणी दिल्याचाही आरोप त्याच्यावर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३८ वर्षांच्या फहीम खानने दहावी पर्यंतचेच शिक्षण घेतले आहे. तो राजकारणात सक्रीय आहे. लोकसभा निवडणुकीत फहीम खान नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी एक होता. निवडणुकीत गडकरी विजयी झाले आणि त्यांच्या विरोधातील फहीमसह सर्व उमेदवारांचा पराभव झाला. निवडणुकीनंतर फहीम खान आता दंगलीच्या निमित्ताने पुन्हा चर्चेचा विषय झाला आहे.