महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका दिवाळीत होतील, असे अपेक्षित आहे. राज्यातील निवडणुका भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगट व सहयोगी यांच्या महायुती आणि राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व सहयोगी पक्ष यांच्या महाविकास आघाडी अशी ही लढत अपेक्षित आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी सरळ लढत महाराष्ट्रात झाली. आता आणखी दोन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होतील. या निवडणुकीची तयारी आता सुरू झाली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला स्वत:चे अस्तित्व शोधायचं आहे, टिकवायचं आहे. विधानसभा निवडणुकीत कोणाचं बळ किती आहे याची अजमावणी केली जाणार आहे.
माझे कोकण – संतोष वायंगणकर
महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना सर्वांना स्वतःचं अस्तित्व आणि वर्चस्व सिद्ध करायचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाचे किती आमदार निवडून येणार याची चाचपणी सुरू केली असून आपल्याच पक्षाचे जास्तीत जास्त आमदार असले पाहिजेत, निवडून आले पाहिजेत. यासाठी चाचपणी सुरू आहे. शेवटी ही राजकीय स्पर्धा आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक पक्ष आपली बार्गेनिंग पॉवर सतत वाढवण्याचा प्रयत्न करणारच. त्याच प्रयत्नांची रंगीत तालीम सध्या राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते करताना दिसतात. सध्याचं हे आघाडी, युतीचं राजकारण आहे. पूर्वीसारखी एकाच पक्षाच वर्चस्व आणि त्यांची सत्ता हे राजकीय गणित बिघडलं आहे. बेरजेचे राजकारण सध्या सुरू आहे. त्यामुळे सत्तेच राजकारण करताना साथ-साथचा नारा देत निवडणुकांना सामोरे जाण्याचा प्रयत्न होत आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत इतर प्रांतापेक्षा जनतेने वेगळा कौल दिलेला. कोकणातील जनता, भाजपा, शिंदेसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या बाजूने राहिल्याचे चित्र आपणाला पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीत महायुतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती; परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढवणार असल्याचे घोषित केले आहे. अर्थात सध्याच्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकारणात कधी कसे व कुणाशी समझोता होईल हे सांगण कठीण आहे. मात्र, महाराष्ट्रातील कोकण प्रांतातही विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. कोकणातील रायगड, पालघर, ठाणे, कल्याण व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलं यश मिळालेलं असल्याने कोकणात महायुतीला विधानसभेतही जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी महायुतीचे प्रयत्न आहेत. मात्र विधानसभेची निवडणूक लढवायची तर त्याची बांधणी अगोदरपासूनच करावी लागते. तशारीतीने मतदारसंघ बांधणी पाच वर्षे केली जाते. मतदारसंघातील ग्रामस्थांशी संवाद, विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातात.
सामान्य जनतेशी नेहमीचा संपर्क, गाठी-भेटी, संवाद यामुळे साहजिकच निवडून येण्यासाठी आवश्यकती सर्व तयारी केली जाते. त्या प्रयत्नांना यश येत गेलं की निवडणुकीचा आखाडा अधिक सोपा होत जातो. जनतेशी कनेक्टीव्हीटी अधिक महत्त्वाची ठरते. सध्या त्याच पद्धतीने सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा निवडणूक या लोकसभेत ज्या मतदारसंघात मिळालेलं मताधिक्याचा विचारही त्यामध्ये असणार आहे. यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुका या वेगळया पद्धतीने लढविल्या जातील. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघात अनेक इच्छुक आहेत. दावे, प्रतिदावेही केले जात आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांचे शिवसेनेचे पराभूत खासदार विनायक राऊत विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. माजी खासदार विनायक राऊत यांना लोकसभेतील पराभवानंतर विधान परिषदेत संधी मिळेल असे वाटले होते. तसे प्रयत्नही विनायक राऊत यांनी केले; परंतु मिलींद नार्वेकर यांनी विधान परिषदेची उमेदवारी मिळवली आणि विजयीही झाले. यामुळे विनायक राऊत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मातोश्रीतूनही त्यांना ग्रीन सिग्नल मिळाला होता, तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांना उभे करून विनायक राऊत राजापूर विधानसभा निवडणूक लढवू शकतात असे म्हटले जाते. विनायक राऊत विधानसभेत जाण्यासाठी उत्सूक आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघांतून गेली पाच वर्षे विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे माजी खासदार निलेश राणे यांचे राहिले आहे.
या मतदारसंघात त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. लोकसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघात २८ हजारांचे भाजपाला मताधिक्य राहिले आहे. विकासकामांच्या बाबतीतही निलेश राणे कोट्यवधींची काम पालकमंत्री रवींद्र चव्हाण व खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून या मतदारसंघात झाली आहेत. सावंतवाडी मतदारसंघात शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मात्र, या सावंतवाडी मतदारसंघात माजी आमदार राजन तेली, विशाल परब या मतदारसंघातून इच्छुक आहेत. महायुतीकडून दीपक केसरकर की अन्य कोणी अशी चर्चा होत असताना उबाठाकडून विनायक राऊत नसतील तर कोण उमेदवार असणार यासंबंधी चर्चा होत असताना निवडणुकीदरम्यान बऱ्याच राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघात विद्यमान आमदार नितेश राणे यांनी जनसंपर्क आणि विकासकामे या दोन्ही बाबतीत अग्रक्रम राखला आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून माजी सभापती नागेश मोरये इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. राजापूर मतदारसंघातून महायुतीकडून कोण निवडणुक लढवणार यासंबंधीही अनेक नावांची चर्चा होत आहे. विधानसभा निवडणुका जस-जशा जवळ येतील तशी कोकणात आणखी काही नावं चर्चेत येतील. निवडणूक म्हटली की चर्चा तर होणारच.