Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Rain : मुंबईत आजही अतिमुसळधार! तिन्ही मार्गावरील लोकल ट्रेन विस्कळीत

Mumbai Rain : मुंबईत आजही अतिमुसळधार! तिन्ही मार्गावरील लोकल ट्रेन विस्कळीत

मुंबई : मुंबईकरांचा विकेण्ड पावसामुळे (Mumbai Rain) घरातच गेला असून सोमवारीही पावसाचा जोर (Heavy Rain) कायम आहे. गेल्या ३ दिवसांपासून मुंबईसह उपनगरातील अनेक भागाला पावसाने चांगलेच झोडपल्याने सखल भागात पाणी साचले आहे. याचा परिणाम मुंबईतील वाहतूक सेवेवरही जाणवत आहे.

मुंबईतही गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस झाला. काल रात्रीच्या सुमारास पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, सोमवारी पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगर परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे.

हवामान खात्याने सोमवारी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे येत्या २४ तासांमध्ये मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

पहाटेपासूनच मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळी कार्यालयात आणि दैनंदिन कामकाजासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडताना दिसत आहे.

तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवेवर परिणाम

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणा-या उपनगरीय रेल्वे सेवेवरही पावसाचा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन ५ ते १० मिनिटे आणि हार्बर रेल्वेच्या लोकल ट्रेन तब्बल १५ मिनिटं उशीराने धावत आहेत.

पाऊस असल्याने रस्ते वाहतूक नेहमीप्रमाणे संथगतीने आहे. येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे.

कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या परिसरामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले आहे. त्यामुळे सकाळी घराबाहेर पडलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहेत.

कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुडघाभर पाणी साचले आहे. गुरुदेव हॉटेल ते शिवाजी महाराज चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा रस्ताही जलमय झाला आहे.

मुंबईकरांचा विकेण्ड पावसामुळे घरातच गेला. कालही मुंबईतील वाहतूक सेवेवरही याचा परिणाम जाणवला. मुंबईत लोकल १५ ते २० मिनिटं उशिराने धावत होत्या. मुंबईत सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दादर, परळ या भागांमध्ये पाणी साचले. याचा फटका वाहतुकीवर झाला. महत्त्वाचे म्हणजे परळ भागात असलेल्या वाडिया आणि के.ई.एम. रुग्णालयाच्या परिसरात एक ते दीड फुटापर्यंत पाणी साचल्याने या रस्त्यावरून होणा-या वाहतुकीला फटका बसला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -