मनस्विनी – पूर्णिमा शिंदे
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः…
गुरुपौर्णिमेचे महत्त्व.
आषाढ शुद्ध पौर्णिमेला ‘व्यासपौर्णिमा’ म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा हा मंगल दिन.आपल्या देशात रामायण, महाभारत काळापासून गुरू-शिष्य परंपरा चालत आली आहे. ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, त्या विद्येच्या बळावर आपण स्वतःसह सर्वांचा समाजाचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, हे आपले आद्य कर्तव्यच. भारतीय गुरुपरंपरेत गुरू-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञ वलक्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदीपनी, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरू-शिष्य परंपरा आहे; मात्र एकलव्याची गुरूनिष्ठा श्रेष्ठच…! श्रीकृष्णांनी तर गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांनाच गुरू मानले. संत नामदेवांनी विसोबा खेचर यांना गुरू केले म्हणून गुरू पूजा ही पूजनीय आहे. ‘गुरू बिना ज्ञान कहासे लावू’ हेच खरे गुरू पायी लीन झाल्याशिवाय ज्ञान प्राप्ती होऊ शकत नाही आणि वाटही दिसू शकत नाही. त्यामुळे गुरूच्या चरणी मस्तक टेकवून, लीन होणे गरजेचे आहे. कारण गुरू म्हणजे नावाडी वाटाड्या मार्गदर्शक आहे. या सद्गुरूंची पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा.
प्रकाश, मांगल्य, पावनता, गुरू शिष्याला ज्ञान देणारी जो ज्ञानाचा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचवतो. गुरुजी, आचार्य, शिक्षक यांच्याविषयी श्रद्धा, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. साक्षात त्यांना देवासमान मानून, तेच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतात. त्यांना प्रथम वंदन करून, ज्यांच्याकडून विद्याप्राप्ती होते, नवी दृष्टी लाभते, गुरू हेच वाट दाखविणारे, मार्गदर्शक, आधारस्तंभ, आत्मविश्वास देणारे, कौतुक-प्रोत्साहन प्रसंगी कान पकडून दंडशासन शिक्षा देणारे; पण तितक्याच मायेने जवळ घेणारे म्हणजे गुरू माऊली गुरू साक्षात परब्रह्म. देवाहून ते वेगळे भिन्न नाहीत. ते देवाचेच रूप.
गुरू म्हणजे परमपिता,
परमपूज्य, परमेश्वर…
गुरू ज्ञानाचा सागर
अमृताची खाण
ज्ञान दानात श्रेष्ठदान
गुरुराखती विद्येचा मान
करूनही रक्ताचे पाणी
गुरू-शिष्यास बनवि मोत्याचे मनी
म्हणून गुरू मानावे देव समान
विद्या सरस्वतीचा करूनही, अपमान
ती प्रसन्न झाली, तरच जीवनात लाभे शुभ स्थान.
साक्षात दत्तगुरू स्वतः गुरू असूनदेखील त्यांनी २४ गुरू केले. जो जो जयाचा घेतला गुण, तो म्या गुरू केला जाणं… अवधुतांनी चोवीस यांचे महत्त्व तीन प्रकारांत सांगितले. एक सद्गुण अंगी येण्यासाठी गुरू करावा, दुसरा अवगुण त्यागासाठी गुरू करावे आणि तिसरा ज्ञान प्राप्तीसाठी गुरूंच्या ध्यानाचे, सेवेचे, भावपूजनाचे महत्त्व गुरुचरित्रात अतिशय सुंदर वर्णले आहे. ही जी गुरुकृपा आहे, गुरू आशीर्वाद आहे तो सन्मार्गाकडे, परमार्थाकडे, अध्यात्माकडे नेणारा भक्तिभाव आणि त्यासाठी आवश्यक गुरुपूजन, ज्ञानबोध, उपदेश, संदेश, शिकवण, गुरुनिष्ठा यांसाठी अनुसंधान महत्त्वाचे आहे.
गुरुविषयी असणारी कृतज्ञता, आत्मीयता, जाणीव, जिव्हाळा, श्रद्धा यांची जोड हवी. स्वतःकडे लघुत्व घेतले की, गुरुत्व आपोआप आपल्याकडे येते. ती दृष्टी जो दाखवतो तो गुरू. ही दृष्टी दाखवण्याचे कार्य करतात साधक आणि कधीच गुरूची निंदा करू नये पाप लागते. गुरू ही व्यक्ती नसून चैतन्य शक्ती आहे. आपला संपूर्ण विश्वास आणि श्रद्धेचे स्थान आहे. त्यांचा आशीर्वाद असावा, यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी, आपण त्यांच्यात लीन होणं आवश्यक असतं, तरच साधकाला अनुग्रह होतो आणि तेव्हा तो त्याचा दुसरा जन्म असतो.
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे
त्या त्या ठिकाणी नीजरूप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी
तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही.
सद्गुरूंचा सहवास सुमधुर असण्यासाठी, आपण देवाच्या भक्तीत लीन व्हावे, तरच तो संकटात वाट अन् संघर्षाला सहन करण्याची शक्ती देईल. प्रारब्ध व्यक्तींचीही दुःख, भोग, तीव्रता कमी होईल. गुरू शब्दाचा अर्थ असा की, ‘ग’कार म्हणजे सिद्ध, ‘र’ कार म्हणजे पापाचे दहन आणि ‘उ’ कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप. गुरू हाच ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे त्रिगुणात्मक रूप. या जगापलीकडले ब्रह्म, तत्त्व, परब्रह्म जाणण्यासाठी गुरू आवश्यकच आहे. अज्ञान नष्ट करून ज्ञानदान देणारे, गुरू एक तेज आहे. प्रकाश आहे. वलय आहे. दीक्षा आहे. मोठा ज्ञानाचा सागर आहे. सच्चित आनंद, अमृत, अक्षय, खजिना आहे आणि एक प्रसाद आहे. तो प्रत्येकाच्या भाग्यात नसतो. ही गुरुदीक्षा प्राप्त करण्यासाठी, आपल्याला भवसागर पार करून, शिष्य ही ओळख निर्माण करावी लागते, तरच त्याची प्रचिती आत्मानंदात शक्ती प्राप्त होते. तो शिष्य भाग्यवान सत्पात्री. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शक आधारस्तंभ, दीपस्तंभ, मार्ग दाखविणारे जीवन उजळविणारे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणणारे, गुरुजन, गुरुमाऊली जे जे लाभले त्या प्रकृतीतील प्रत्येकाला मग आई-वडील, शिक्षक, निसर्ग या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा! ओम नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे! असे म्हणून गुरू वंदन करावे गुरू एक जगी त्राता…!