विशेष – लता गुठे
पावसाचं आणि माणसाचं नातं हे या जन्माचंच नाही, तर ते अनेक जन्माचं असावं, असं मला नेहमी वाटतं. मला पाऊस प्रचंड आवडतो; कारण माझा जन्म पावसाळ्यात झाल्यामुळे माझी आणि पावसाची मैत्री माझ्या जन्मापासूनची आहे, हे मात्र नक्की. पाऊस आला की, मी खिडकीत उभी राहून, त्याच्याशी बोलू लागते… त्याचा थंडगार वारा मनाला सुखावून जातो आणि शब्द उसळ्या मारू लागतात… माझ्याच एका कवितेत मी म्हटलं आहे…
नेहमी येतो तसा तो आजही आला
खिडकीबाहेर उभा राहून बोलवू मला लागला
अनोळखी नव्हतो आम्ही,
ओळखत होतो एक दुसऱ्याला
भुलवून त्याच्या इशाऱ्याला
मी त्याला आलिंगन दिलं
पावसाचं अन् कवितेचे नातं आणखी दृढ झालं
आठवणीतल्या पावसाच्या अनेक कविता जन्माला येतात, तेव्हा ऋतू कोणताही असला, तरी मनाला त्या ओलावून जातात…
असा अवखळ पाऊस
त्याच्या करामती काय सांगू
कागदाच्या बोटीसंगे
पाण्यामध्ये लागे रांगू
असं सहजच शब्द पावसाचे थेंब होऊन येतात अन् पावसाच्या कविता होतात. आपण आपल्याला समजायला, उमजायला लागल्यापासून पावसाशी नातं जोडलेलं असतं. तो आपल्याबरोबरच मोठा होतो, तरुण होतो आणि वेगळ्या रूपात, वेगळ्या ढंगात तो आपल्या मनात रुजायला लागतो. ‘येरे येरे पावसा तुला देतो पैसा’ म्हणत आपण अंगणातल्या तळ्यामध्ये कागदाच्या बोटी खेळू लागतो आणि आपल्या बोटीबरोबरच पाऊसही नाचू लागतो… ग. दि. माडगूळकर यांची सर्वांना आवडणारी कविता
‘नाच रे मोरा आंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच
काळा काळा कापूस पिंजला रे
ढगांशी वारा झुंजला रे…
हे गाणं म्हणताना अजूनही लहान झाल्यासारखं वाटतं. हे गाणं म्हणत आपल्यापैकी सर्वच नाचली असतील. कित्येक पिढ्यांनी हे गाणं अनुभवलं आणि आजही आजी नातवंडांना हे गाणं शिकवताना रमून जाते. पहिल्या पावसात येणारा मातीचा सुगंध मनाचा गाभारा दरवळून टाकतो. हा अनुभव प्रत्येक पावसात आपण आसुसून घेत असतो. शाळेच्या पत्र्यावर पाऊस जेव्हा टप टप टापा वाजवीत यायचा, तेव्हा पाऊस घोड्यावर बसून भेटायला आल्यासारखा वाटायचा. हवाहवासा वाटणारा पाऊस झड लागली की, मात्र नकोसा वाटायचा. सगळीकडे चिखल, राडा, ओले कपडे यामुळे आई वैतागायची. घरात ओली चूल पेटायची नाही. आई भिजायला जाऊ नको म्हटली, तरी पण तिचा डोळा चुकवून कधी एकदा पावसात भिजायला जातोय आणि कधी नाही असं व्हायचं. पावसात भिजायला जायचं मग सर्दी, पडसं, खोकला, नाक गळणं, शिंका हे ठरलेलं असायचं. पाऊस नाही आला की, निरभ्र आकाशाकडे पाहून म्हणायचं… “येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा…”
ही गाणी म्हणत बालपण संपलं आणि शाळेच्या बाकावर बसून म्हटलेल्या पावसाच्या कविता आजही आठवतात… बालकवींची ‘श्रावणमासी’ ही नितांत सुंदर कविता आजही जशीच्या तशी आठवते. त्या कवितेतून बालकवी भेटले. आमच्या गुरुजींनी ती कविता शाळेच्या जवळ असलेल्या टेकडीवर नेऊन पावसात शिकवली. पावसाचा ओला स्पर्श मनाच्या आरपार गेला… तरुणपणात पाऊस भेटला, तो गुलाबी रंगाचा हळव्या अंगाचा, लाजरा-साजरा असा… आणि माझ्या एका कवितेतून तो अधोरेखित झाला
पहिलं पहिलं प्रेम आपलं
पहिलाच गुलाबी पाऊस
कॉलेज बाहेर भेट सखे
घरी नको जाऊ…
उघड्या रानात भेटणारा पाऊस झिम्माडत येतो… पिकात धुडगूस घालणारा पाऊस रानमाळावर भेटतो, तेव्हा गवत फुलांचे पैंजण बांधून माझ्या सुरावर नाचणारा पाऊस मला हवाहवासा वाटतो. ना. धों. महानोर यांच्या अनेक रानातील कवितेतून पाऊस वेगवेगळ्या रूपात साकार होतो…
“स्वच्छ पावसाळी हवा तसे बेहोश उधान
हिरव्या गर्दीत पाय गेले बहकून…”
महानोर यांच्या कविता रोमँटिक वळणाच्या. कवितेतील पाऊस हा निसर्गाचा उत्सव साजरा करतो असे वाटते. कधी पाऊस प्रियकर होतो, तर धरती प्रेयसी. त्यांच्या कवितेतील पाऊस देहरूपात भेटतो तेव्हा… तिच्या मनातील भावनेला तो साद घालतो. “येरे घना येरे घना, न्हावू घाल माझ्या मना” ती प्रेयसी त्याला काही तरी सांगू पाहते…
पाडगावकरांच्या कवितेतील पाऊस हा त्यांच्या सारखाच मिश्कील स्वभावाचा… वेंगुर्ल्याचा पाऊस जेव्हा ही कविता ते सादर करायचे, तेव्हा ते शब्द कोकणातील पावसाचे रंग उधळत येतात…
वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा
सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा
काळ्या कळ्या ढगात जेव्हा
आभाळ सगळं बुडायचं
पांढराशुभ्र बगळा होऊन
माझं मन उडायचं
पावसावर कविता लिहिली नाही, असा एकही कवी आजवर मला भेटलेला नाही… माझ्या पावसाच्या कवितांवर मी जितकं प्रेम करते, तितकंच इतर कवींच्याही पावसाच्या कवितांवर प्रेम करते…
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील पाऊस अहिराणी बोलीचा दरवळ घेऊन येतो, तेव्हा खानदेशात घेऊन जातो…
आला पाऊस पाऊस आता सरीवर सरी
शेत-शिवार भिजले नदी-नाले गेले भरी
आला पाऊस पाऊस शिंपडली भुई सारी
शेत-शिवार भिजले नदी-नाले गेले भरी
पाऊसाची अनेक रूप कवींच्या कवितांमधून पाहायला मिळतात. कधी त्याचं अक्राळ-विक्राळ रूप पाहिलं की, अंगाचा थरकाप उडतो. जेव्हा २२ जुलैला मुंबईमध्ये पाऊस पडला, त्यावेळेला काय अवस्था झाली होती, हे सगळ्यांनीच अनुभवले आहे… शशिकांत तिरोडकर यांची मिठी नदीवर असलेली कविता… आजही ऐकताना त्या दिवसाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते… खरं तर निसर्गाचं स्त्री रोग म्हणजे नदी असं समजलं जातं… आणि त्या नदीवर जेव्हा अतिक्रमण होतं तेव्हा… कवी म्हणतो,
नदीला जेव्हा नाला म्हटलं
तिथेच तिचं हृदय फाटलं
महानगरीवरचं तिचं प्रेम
भर पावसात आटलं
कुसुमाग्रजांची ‘कणा’ कविता ही अशाच पावसाच्या रुद्र रूपावर आहे…
ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून…
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यातली जवळीक सांगणारी ही कविता. पावसामुळे घरातील सगळं काही वाहून जातं. अशीच सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संतांची एक कविता मला
अतिशय आवडणारी…
अंधारानेकडे घातले घराभोवती
जळधारांनी झडप घातल कौलारांवर
एकाकीपणा आले पसरत
दिशादिशातून घेरावयास्तव…
त्यांच्या मनाची असलेली अवस्था कवितेतून व्यक्त होते, तेव्हा मनाचं आभाळ भरून येतं आणि त्या अंधारात विचारांच्या सरी झडप घालू लागतात किंवा त्यांचीच दुसरी कविता ‘ऐक जरा ना’ कवयित्री पावसाला सांगते…
नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली
नको नाचू तडा तडा असा कौलारावरून
तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कुठून
प्रवासात भेटणारा पाऊस डोंगरावर पाय सोडून बसलेले ढग, वाहणारे नदी-नाले, हिरवागार निसर्ग झरझर आवाज करीत कोसळणाऱ्या सरी हे सगळं पाहिलं की, ते निसर्गाचं आगळं-वेगळं रूप डोळ्यांच्या कॅमेऱ्यात टिपून घ्यावसं वाटतं आणि मग तेच कवितेतून अधोरेखित होतं
आली सर गेली सर
कुठे कुठे रेंगाळत, कुठे गडूळले डोह
कुठे ओघळ वाटेत
मला नेहमी वाटतं, पाऊस हा या धरतीचा प्रियकर असावा. आठ महिन्यांनी तो येतो आणि तिची प्रतीक्षा संपते. जेव्हा पहिला पाऊस तिला स्पर्श करतो, तेव्हा तिच्या मनाचा गाभारा दरवळून जातो… आणि गर्भात पडलेल्या बियांना अंकुर फुटतात, तेव्हा ती आई झाल्याचा आनंद व्यक्त करू लागते.
ऋतू आले, खेटुनी गेले
ना दुसरा मनात रुजला
पुन्हा भेटण्याचे वचन देऊन
पाऊस काळीज घेऊन गेला
चार महिने त्यांचा मीलनाचा सोहळा संपवून, पाऊस तिचं जणू काही काळीजच घेऊन निघून जातो आणि ती पुन्हा उदास होते. हिरवे अंकुर करपून जातात आणि ती विरहिनी पुन्हा त्याची वाट पाहू लागते. तेव्हा मला ते प्रेम वेड्या राधेसारखे वाटते. प्रत्येक स्त्रीची व्यथा तिची भेगाळलेली काया व्यक्त करते. पुन्हा भेटीचे वेध लागतात आणि ती मेघराजाला बोलावू लागते… अशा वेळेला वाटतं की, धरतीची लेक राधा आहे, राधेचं रूप माझ्यात आहे आणि तिघींचीही व्यथा एकच आहे… आणि पुन्हा माझ्या कवितेतून पावसाला मी आमंत्रण देते ते असं…
हात जोडीते मी तुला ऐक माझं तू मागणं
पहा जरा भुईकडं टाहो फोडीते जमीन
आणि पुन्हा तो येतो…
अनेक गाण्यांतून, कवितांमधून त्यांचा मीलन सोहळा साकार होतो… शांताबाईंच्या कवितेतील दोन ओळी
आला पाऊस मातीच्या वासात गं
मोती गुंफित मोकळ्या केसात गं
किंवा
पाऊस आला, वारा आला,
पानं लागले नाचू।
थेंब टपोरे गोरे गोरे, भर भर गारा वेचू।।
अशाप्रकारे अव्याहतपणे चालणारं हे कवितेचं अन् पावसाचं नातं इंद्रधनुष्याच्या सप्तरंगामध्ये रंगून जाणारं अलवार असलेलं…!