मुंबई: भारताने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या पहिल्या हंगामाचा खिताब जिंकला आहे. युवराज सिंगच्या नेतृत्वात इंडियन चॅम्पियन्सने १३ जुलैला एजबेस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळवण्यात आलेल्या फायनल सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्सला ५ विकेटनी हरवले.
पाकिस्तानचा कर्णधार युनिस खानने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या संघाने २० षटकांत ६ बाद १५६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने हे आव्हान १९,१ षटकांत पूर्ण केले. अंबाती रायडूने ३० बॉलमध्ये ५० धावा ठोकल्या आणि भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताची सुरूवात चांगली झाली. सलामी फलंदाज रॉबिन उथप्पा आणि रायडू यांनी पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच सामना केला. रायडूने पहिल्या ओव्हरमध्ये आमिर यामीनला चौकार-षटकार लगावत धमाकेदार सुरूवात केली.
The strike with which India Champions made the WCL trophy theirs ❤️#IndvPakonFanCode #WCLonFanCode pic.twitter.com/vqodrKyYTD
— FanCode (@FanCode) July 13, 2024
पहिल्या विकेटसाठी रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायडू यांनी ३४ धावांची भागीदारी केली. उथप्पा ८ बॉलमध्ये १० धावा करून परतला. त्यानंतर अंबाती रायडू आणि गुरकिरत सिंह मान यांनी काळी वेळ भागीदारी केली. १२व्या षटकांत इंडिया चॅम्पियन्सला तिसरा झटका बसला. रायडू ३० बॉलमध्ये ५० धावा करून बाद झाला.
त्यानंतर गुरकिरत ३४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर संघाला पाचवा झटका १५० धावांवर बसला. येथे युसुफ पठाण बाद झाला. तो १९व्या षटकांत दुसऱ्या बॉलवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कर्णधार युवराज सिंहने नाबाद १५ आणि इरफान पठाणने नाबाद ५ धावांची खेळी करत भारताला विजयपथावर आणले.