अजितदादांची सरशी, शरद पवारांचा डाव फसला…
मुंबई : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी काल निवडणूक (Vidhanparishad Election) पार पडली. या १२ वा उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे निवडणूक अटीतटीची झाली. त्यात दोन्ही पक्ष आमचाच विजय होणार असा दावा करत होते. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) काही मते फुटणार असा दावाही सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता. लोकसभेत महायुतीचा पराभव झाला मात्र, विधानपरिषदेत मात्र अखेर महायुतीच (Mahayuti) अव्वल ठरली आहे. नववा उमेदवार जिंकून आणत महायुतीने मविआला धक्का दिला आहे. शिवाय यात काँग्रेसची आठ मतं फुटल्याचंही बोललं जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी काटेकोर रणनीती आखत विजय खेचून आणला. महायुतीने आपले सर्व ९ उमेदवार निवडून आणले. मविआचे दोन उमेदवार निवडून आले. तर शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. काँग्रेसची आठ मतं फुटली आहेत. चुरशीच्या ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला.
भाजपचे पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, योगेश टिळेकर हे पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच निवडून आले. सदाभाऊ खोतांनाही निवडून आणण्यात भाजपने यश मिळवलं. एकनाथ शिंदेंचे शिवसेना कृपाल तुमाने आणि भावना गवळी हे दोन्ही शिलेदार सहज निवडून आले. अजित पवारांनी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर या दोघांनाही निवडून आणलं. दुसऱ्या उमेदवारासाठी मताचा कोटा कमी पडत असतानाही त्यांनी ही किमया करून दाखवली.
काँग्रेसची ८ मतं फुटली
काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय झाला. पण काँग्रेसचे आठ आमदार फुटल्याने त्याचा फायदा महायुतीला झाला. मतांच्या फोडाफोडीवरून एकनाथ शिंदेंनी मविआला टोला लगावला आहे. लोकसभेत झालेल्या पराभवाचा वचपा विधान परिषदेत मविआला धोबीपछाड देत महायुतीने काढला आहे. पण खरी लढाई विधानसभेची आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांचाही विजय झाला. शेकापच्या जयंत पाटलांना पराभवाचा धक्का बसला आहे.
कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली ?
भाजप
पंकजा मुंडे- २६
परिणय फुके- २६
अमित गोरखे- २६
सदाभाऊ खोत- २३
योगेश टिळेकर- २६
अजित पवार राष्ट्रवादी
शिवाजीराव गर्जे – २४
राजेश विटेकर – २३
शिवसेना- (शिंदे)
भावना गवळी – २४
कृपाल तुमाने – २५
शिवसेना (उद्धव ठाकरे)
मिलिंद नार्वेकर – २४
जयंत पाटील, शेकप – १२
काँग्रेस
प्रज्ञा सातव- २५