कागदी लगद्याच्या मुर्त्यांना परदेशात पसंती
प्रशांत सिनकर
ठाणे : महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या धामधुमीला काहीसा अवधी असला तरी, परदेशात बाप्पाच्या येण्याची उत्सुकता आत्तापासून लागली आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परदेशात जाणाऱ्या बाप्पांच्या मुर्त्या चार महिने अगोदर रवाना केल्या जात आहे. प्रथमेश इकोफ्रेंडली संस्थेने कागदी लगद्यापासून बनविलेल्या सार्वजनिक आणि घरगुती मिळून चार बाप्पाच्या मुर्त्या ब्रिटन देशात न्हावाशेवा बंदरातून जहाजाने नुकत्याच रवाना झाल्या आहेत.
नोकरी व्यवसायानिमित्त परदेशात भारतीय नागरिक मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. परदेशी संस्कृतीचा आदर करताना तिथले भारतीय आपले सण उत्सवदेखील तितक्याच थाटामाटात साजरे करताना दिसतात. विशेष करून गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात होत असल्याचे सांगितले जाते. यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी आत्तापासूनच परदेशातील गणेशभक्त काळजी घेत आहेत. बाप्पांची मूर्ती गणेशोत्सव काळात वेळेत उपलब्ध व्हावी म्हणून जून महिन्यातच मुर्त्या परदेशात रवाना होण्यासाठी तयार झाल्या असल्याची माहिती प्रथमेश इकोफ्रेंडली संस्थेचे संदीप गजाकोश यांनी सांगितले.
परदेशात पाठवली जाणारी बाप्पाची मूर्ती पूर्णपणे इकोफ्रेंडली आहे. कागदी लगद्यापासून बनविलेल्या मूर्त्यांना अमेरिका, ब्रिटन, मॉरिशस अशा देशांमध्ये पसंती असते. आता न्हावाशेवा बंदरातून शिपने अमेरिका टेक्सास शहरात सहा मुर्त्या रवाना होणार आहेत. इंग्लंड मधील मिल्टन केनिज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी धार्मिक अणि सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले जाणार असून, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याची मंडळाची परंपरा आहे.
लगद्यात ६० टक्के कागद
कागदी लगद्याच्या मूर्ती सुबक दिसत असून, या मूर्ती बनवण्यासाठी लगद्याच्या ६० टक्के कागद असतो, तर ३० गोंद आणि १० टक्के गुजरात मधून येणारी सफेद रंगाची माती (व्हायटींग). या सर्वांपासून गणेशमूर्ती साकारली जाते. शिपिंगने जाण्यासाठी ६० ते ७० दिवसांचा अवधी लागतो. – संदीप गजाकोश ( प्रथमेश इकोफ्रेंडली संस्था)