Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलवृक्ष नियोजन

वृक्ष नियोजन

प्रत्येकाच्या घरी तुळशी वृंदावनात भरपूर तुळशीची रोपे निघालेली असतील, तर ती रोपे तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात जमिनीत जेवढी जास्तीत जास्त लावता येतील तेवढी लावा. जमिनीत चांगल्या मातीत तुळससुद्धा छातीएवढी चांगली मोठी होते व तीसुद्धा आपल्या घराला प्राणवायूचा भरपूर पुरवठा करते. जितकी जास्त तुळशीची झाडे तितका जास्त प्राणवायू घराला मिळतो. शिवाय तुळशीचे झाड ही एक औषधी वनस्पती आहे.

  • कथा : प्रा. देवबा पाटील

‘आपल्या पृथ्वीचे वातावरण’ प्रकरण शिकवणारे आठव्या वर्गाचे देशमुख सर वर्गावर येताबरोबर सर्व वर्ग प्रफुल्लित झाला.

“सर,” मध्येच जयेंद्र बोलला, “आपण लहान चौकात पेरू, रामफळ, सीताफळ, डाळिंब, लिंबू, मोसंबी, संत्री, केळी, पपई, करवंद अशी झाडे लावली, तर चालतील का?”

“हो हो, मी ते पुढे सांगणारच होतो तेवढ्यात तूच मध्येच बोलला व त्याच गोष्टीचा खुलासा केलास. तू सांगितलेली फळझाडे आपण ज्यांच्या घराला समोर मोठे अंगण किंवा मागे परसबागेसारखी मोकळी जागा आहे त्यामध्ये लावूच, पण आपण आपल्या गावाबाहेरच्या सगळ्या सपाट माळरानांवर वेगेवगळ्या जातीची बोरे, चारे, करवंदे, आवळा, बेल, कवठ, शेवगा, हदगा, लाखाचे झाड…”

“लाखाचे झाड!” मध्येच एकदम आश्चर्यचकित होत एका उपटसुंभ मुलाने “त्या झाडाला लाखो रुपये लागतात का सर?” असा उफराटा प्रश्न विचारला नि सारा वर्ग खो-खो करून हसू लागला.

सरही हसत हसत म्हणाले, “त्याला लाखो रुपये नाही लागत; परंतु बाभळीच्या, निंबाच्या झाडांना येणाऱ्या डिंकासारखा त्याला चिकट द्रव येतो की जो खूप ज्वलनशीलही असतो व त्याच्या चिकटपणामुळे खूप उपयोगीही असतो.”

सर पुढे म्हणाले, “माझ्या सांगण्याचा अर्थ असा की आपण लाख, रुद्राक्ष, गोंधने, बिबा, बेहडा, हिरडा, देवदार, अर्जुन, सागवान, रिठा, पळस, पांगारा, शिकेकाई, सागरगोटी, चारोळी, निलगिरी, कापूर, शमी, आपटा, टेंभुर्णी, भोकर अशी काही मानवी जीवनोपयोगी झाडेही गावाजवळच्या माळरानावर लावू म्हणजे आपल्या गावाला सारी फळे तर गावात मिळतीलच पण आरोग्योपयोगी काही औषधीयुक्त गोष्टीही मिळत जातील.”

“सर, आपण छोट्या-छोट्या रस्त्यांवर, कोपऱ्या-कोपऱ्यांवर तगर, कण्हेर, जास्वंद, चाफा, दुधी मोगरा, पारिजातक, बकुळ, बहावा, खडूचे झाड अशी काही फूलझाडे लावली, तर चालेल का?” सुनंदाने विचारले.

“हो हो जरूर लावू या आपण फूलझाडेसुद्धा. काही मोकळ्या व मोठ्या चौकात सुंदरसा गुलमोहरही लावू. पण मग तोपर्यंत तुम्ही सारे जण आपापल्या घरी एक काम जरूर करा.” सर म्हणाले.

“काय सर?” सर्व मुलांनी विचारले.

“बऱ्याच घरांत खाल्लेल्या फळांच्या बिया जमा करून ठेवण्याचा गृहिणींना वठम असतो. तुमच्या घरी जर कोणी जांभुळ, बोरे, चारे, शेवगा, डाळिंब, आवळे, पपई अशा वेगवेगळ्या फळांच्या बिया आणि कडुनिंबाच्या, गोडनिंबाच्या आठोळ्या, आंब्यांच्या कोया, चिंचोके जर जमा करून ठेवल्या असतील, तर त्याही त्या दिवशी सोबत आणा. आपण त्यासुद्धा काही ठिकाणी लावू. तसेच आता पावसाळा असल्याने प्रत्येकाच्या घरी तुळशीवृंदावनात भरपूर तुळशीची रोपे निघालेली असतील, तर ती रोपे तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात जमिनीत जेवढी जास्तीत जास्त लावता येतील तेवढी लावा. जमिनीत चांगल्या मातीत तुळससुद्धा छातीएवढी चांगली मोठी होते व तीसुद्धा आपल्या घराला प्राणवायूचा भरपूर पुरवठा करते. जितकी जास्त तुळशीची झाडे तितका जास्त प्राणवायू घराला भेटतो. शिवाय तुळशीचे झाड हे एक औषधी वनस्पती आहे. तुळशीच्या झाडाची पाने व मंजिऱ्या या सर्दी, पडसे, ताप, खोकला यांसारख्या लहान-सहान आजारांवर खूप कामी येतात. तसेच तुळशीचा उग्र वास हवेत मिसळल्याने हवेतील कीटाणूही नष्ट होतात आणि आपल्या घराभोवतीचे वातावरण शुद्ध राहते. तसेच सर्वांनी आपल्या अंगणात योग्य ठिकाणी गवती चहा व पुदिना ह्यांची रोपेसुद्धा लावा. या दोन्हीही वनस्पत्या औषधी गुणधर्मांनी युक्त आहेत व मानवी आरोग्यासाठी खूप लाभदायक आहेत. गवती चहा सर्दी-पडसे झाल्यावर उकळून पिणे फायदेशीर आहे, तर पुदिनाची चटणी चवदार तर असतेच पण ती पोटातील जंतू मारण्याच्याही कामी येते.”

“जरूर सर.” सर्वांनी एकआवाजी उत्तर दिले.

सरांचा तास संपला व सर आनंदाने वर्गाहून सरळ मुख्याध्यापकांच्या कार्यालयात गेले.

सर्व मुलांनी घरी जाताबरोबर खरोखरच आपापल्या अंगणात रिकाम्या जागी छोटे छोटे खड्डे करून तुळशीची रोपटे लावलीत. त्यांना छोट्या बादल्यांनी पाणीसुद्धा दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -