Wednesday, April 23, 2025
Homeसाप्ताहिककोलाजकुसूरची माऊली, शक्ती दारूबाई

कुसूरची माऊली, शक्ती दारूबाई

कोकणात भटकंतीसाठी अनेक ठिकाणे आहेत आणि ती पर्यटकांनी भरूनसुद्धा गेलेली असतात. पण अतिशय शांत आणि रमणीय ठिकाणांचीसुद्धा कोकणात काही कमी नाही. कोकण म्हटले की, डोळ्यांसमोर उभा राहतो तो हिरवा निसर्ग, फेसाळणारा समुद्र, नारळी-पोफळीच्या बागा आणि त्यातून जाणारी लाल मातीची पायवाट, कौलारू घरे व त्यातील अगत्यशील माणसे. असे हे कोकण अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे येथील जागृत देवस्थाने सुबक मंदिरे आणि थक्क करणाऱ्या कथा…

कोकणी बाणा : सतीश पाटणकर

तळकोकणातील वैभववाडी तालुक्यातील कुसूर हा बारा वाड्यांचा गाव. प्राचीन वारसा लाभलेला, डोंगर दऱ्या-खोऱ्यात वसलेला निसर्गरम्य गाव हीच कुसूरची ओळख. एका बाजूला वळणावळणांचा करूळ घाट तर दुसरीकडे निसर्गरम्य भुईबावडा घाट असे कोल्हापूरला जोडणारे दोन्ही घाट कुसूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर. तसेच राधानगरीच्या दाजीपूर अभयारण्याचा सहवास लाभल्यामुळे कुसूर गाव जंगल, झाडे, वेली, वन्यजीव यांनी समृद्ध बनलेला आहे.

कुसूर गावचे मानकरी साळुंखे पाटील आहेत, असे असले तरी १२ बलुतेदार आणि १८ अलुतेदार समाजातील रयत ही मोठ्या गुण्यागोविंदाने वर्षानुवर्षे एकत्र नांदत आहेत. ह्या सर्व समाजांना जोडणारा दुवा आहे श्री देव रामेश्वर आणि कुसूरची माऊली आई दारूबाई. कोकणात भटकंतीसाठी अनेक ठिकाणे आहेत आणि ती पर्यटकांनी भरूनसुद्धा गेलेली असतात. पण अतिशय शांत आणि रमणीय ठिकाणांचीसुद्धा कोकणात काही कमी नाही. कोकण म्हटले की, डोळ्यांसमोर उभा राहतो तो हिरवा निसर्ग, फेसाळणारा समुद्र, नारळी-पोफळीच्या बागा आणि त्यातून जाणारी लाल मातीची पायवाट, कौलारू घरे व त्यातील अगत्यशील माणसे. असे हे कोकण अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे येथील जागृत देवस्थाने, सुबक मंदिरे आणि देव-देवतांच्या थक्क करणाऱ्या आख्यायिकांकरिता. काही परिचित तर बरीचशी अपरिचित अशी ही देवस्थाने. प्राचीन सुंदर मूर्ती, जुनी मंदिरे, त्याच्याशी जोडला गेलेला रोमहर्षक इतिहास आणि निसर्गनवल अशा गोष्टींचा मिलाफ जर पाहायचा आणि अनुभवायचा असेल, तर तळकोकणातील वैभववाडी तालुक्यातील श्री देव रामेश्वर आणि कुसूरची माऊली आई दारूबाई परिसराला भेट द्यायलाच हवी.

कुसूरचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू रामेश्वर, कुलस्वामिनी शक्ती दारूबाई हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान आहेत. कुसूरचा वाडिया जत्रोत्सव वैभववाडी पंचक्रोशीत विशेष प्रसिद्ध आहे. वर्षानुवर्षे चालत आलेला हा जत्रोत्सव कार्तिक महिन्याच्या चतुर्दशी अमावास्येला साजरा होत असतो. एखादा सण अथवा ग्रामदेवतेचा उत्सव पंचक्रोशीतील लोकांनी एकत्र येऊन साजरा करण्याच्या पद्धतीला  जत्रा किंवा मेळा असे म्हणतात. लोक संपर्क वाढविणे हा जत्रेचा मुख्य उद्देश असतो. पहिल्या दिवशी रात्री दहाच्या सुमारास श्री देव रामेश्वर, शक्ती दारूबाई मंदिरात साळुंखे पाटील, सात हिस्सेदार मंडळींकडून पूजाअर्चा, देवीची ओटी भरणे, देवतांना नैवेद्य, वाडी दाखवणे आदी कार्यक्रम संपन्न होतात, तर दुसऱ्या दिवशी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येते. यावेळी माहेरवाशिणी, लेकी-सुना-माता दारूबाईची ओटी भरतात. देवाला नवस बोलले जातात. या वर्षीचा वाडिया जत्रोत्सव ९ आणि १० जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. पंचक्रोशीतील भाविकांसोबतच, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यासोबतच मुंबई, ठाणे, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांतून, गोवा, कर्नाटक, केरळ, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी इतर राज्यांतून तसेच परदेशांतून ही भाविक वाडिया जत्रोत्सवाला हजेरी लावतात. ही देवी नवसाला पावणारी असल्यामुळे आजूबाजूच्या गावातून लांबून लांबून आणि भाविक आवर्जून देवीच्या दर्शनासाठी येतात. तारा गाव अगदी गजबजून गेलेला असतो.

गावातील लोक आधीपासूनच या उत्सवाची तयारी करू लागतात. देऊळ स्वच्छ करणे, रंगरंगोटी करणे, मंडप घालणे वगैरे सर्व तयारी केली जाते. देवळाच्या समोर पेढे, प्रसाद, मिठाई, खेळणी वगैरे दुकानाची दुकाने ओळीने मांडलेली असतात. माहेरवाशिणींच्या हाकेला धावून जाणारी आई अशी ख्याती आणि अनुभव असल्यामुळे मोठ्या संख्येने  माहेरवाशिणी, लेकी-सुना देवीची खणा नारळाने सहकुटुंब ओटी भरण्यासाठी आवर्जून हजर राहतात. गावातील प्रत्येक घरात पाव्हणे मंडळी आलेली असतात. बाकी वेळी कुलूपबंद, शांत असलेले गाव, वाडियाच्या दोन दिवसांत मात्र लोकांनी गजबजून जाते.

गावात पावणादेवी, गांगो रवळनाथ, ब्राह्मणदेव, महाकाली, दत्तगुरू, श्रीकृष्ण, श्रीराम, हनुमान आदी देवांची ही मंदिरे आहेत. गावात वाडिया जत्रोत्सव, शिमगोत्सव, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा असे अनेक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. अशा या ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या जागृत देवस्थानाला भेट देण्यासाठी दरवर्षी असंख्य भक्तगण येत असतात.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -