मुंबईतील ‘या’ जाहिरातीवर नेटकऱ्यांनी घेतला आक्षेप
मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधले असून या जाहिरातीमध्ये मराठी वेशभुषेत (Marathi women) कामवालीबाई (Kamwali Bai) दाखवल्यामुळे नेटकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत आक्षेप घेतला आहे.
सोशल मीडियावर रोज वेगवेगवेळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. कधी मजेशीर व्हिडीओ तर कधी मजेशीर फोटो. कधी लोकांना काही फोटो, व्हिडीओ पटत नाही, तेव्हा त्यावर जोरदार टिका केली जाते. सध्या अशीच एक जाहिरात व्हायरल होत आहे. मुंबईमध्ये ठिकठिकाणी या जाहिरातींचे मोठे होर्डिंग्ज लागले आहेत. त्याचा फोटो एका इंस्टापेजवर शेअर करण्यात आला आहे. ही जाहिरात घरकाम करणाऱ्या महिलांबाबत आहे. या जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधले असून आता त्यावर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही जाहिरात एका वेबसाईटची आहे जी कामवालीबाई म्हणजेच झाडू-फरशी करणाऱ्या घरकाम करण्याची सेवा पुरविते. इंस्टाग्रामवर dadarmumbaikar या पेजवर या जाहिरातीचा फोटो पोस्ट केला आहे. फोटो शेअर करताना, ‘मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या होर्डींग्जवर ही जाहिरात झळकतेय. एकीकडे बाईपण भारी देवा, आणि दुसरीकडे ही जाहिरात… यापेक्षा मोठी विसंगती काय असू शकते?’ #पुरोगामीमहाराष्ट्र #मराठीपोशाखकामवाल्यांचा?” असे कॅप्शन दिले आहे.
या जाहिरातीच्या पोस्टरवर, ”तुमच्या बायकोसाठी सर्वोत्तम गिफ्ट म्हणजे कामवाली बाई” असे लिहीलेले दिसत आहे आणि खाली वेबसाईटच्या सेवांबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर एक कामवालीबाई म्हणून नऊवारी नेसलेली आणि नथ घातलेली महिला महाराष्ट्रीयन वेशभुषेत दिसत आहे. याच फोटोवर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे कारण जाहिरातीमध्ये कामवाल्या बाईला महाराष्ट्राच्या पारंपारिक वेशभूषेत दाखवले आहे. कित्येकांना ही बाब पटलेली नाही.
फक्त या जाहिरातमध्ये नव्हे तर बॉलीवुडमध्येही कित्येक चित्रपटांमध्ये घरकाम करणाऱ्या महिला या महाराष्ट्रीयन वेशभुषेतच दाखवल्या जातात, असा आरोप कित्येकजण करतात. एकाने कमेंटमध्ये लिहीले आहे की, ‘बॉलीवूडमध्ये कामवाली बाई ही मराठी दाखवतात, सर्वात श्रीमंत राज्य असून मराठी माणसाची मुंबईमध्ये ही काय अवस्था झाली आहे.’
तर दुसऱ्याने संबंधित वेबसाईटला या फोटोबाबत तक्रार केल्याचे सांगितले, मराठी पारंपरिक वेशभूषेस एखाद्या कामाशी निगडित करून मराठी माणसांना त्यांच्याच राज्यात त्यांना कमी लेखत आहात, असा आरोप त्यांच्यावर केला आहे
तर आणखी एका युजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की, ”हा आपल्या सर्वांसाठी डोळे उघडणारा क्षण आहे. मराठी कुटुंबांमध्ये मध्यमवर्गीय लोकसंख्या जास्त असल्यामुळे बऱ्याच महिला इतरांच्या घरी घरकाम करतात. कारण मराठी लोक जेवढं मिळतं त्यातचं समाधानी असतात. कोणताही धोका पत्करत नाही. व्यवसायामध्ये उतरा, पैसा कमवा म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांना घरकाम करावे लागणार नाही.”
अन्य एकाने लिहिले आहे की, ”एकदम मराठी द्वेष्टी आणि पितृसत्ताक मानसिकतेची जाहिरात आहे.”
”फक्त मराठी महिलाच कामवाली बाई दाखवायची का?’ असेही एकाने कमेंटमध्ये म्हटले आहे.
आणखी एकाने लिहिले आहे की, ”मराठी स्त्री म्हणजे कामवाली, अडाणी बाई असेच वाटत ह्या बॉलिवूडमधील लोकांना. कोणत्याही हिंदी सिनेमामध्ये कामवाली स्त्री ही मराठी आणि अडाणी असलेली दाखवतात. ही प्रतिमा पुसून टाकणे मराठी लोकांच्या हातात आहे.”
या जाहिरातीवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून आता एका नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचे दिसते आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra