मुंबई : साताऱ्यात असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हीसी) मुख्यमंत्री सचिवालयातील ६५ फाईल्सचा निपटारा केला. मुख्यमंत्री शिंदे हे तीन दिवसांच्या सुटीवर गेल्याची काल राज्यभरात चर्चा होती. त्यातच त्यांनी साताऱ्यात राहून मंत्रालयातील फायलींचा निपटारा केल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी एक प्रकारे Work From Home करत विरोधकांची बोलती बंद केली आहे.
मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांच्या फाईल्स येत असतात. त्या प्रलंबित राहू नयेत म्हणून नियमित निपटारा करण्यात येतो. मुख्यमंत्री सध्या सातारा दौऱ्यावर असून सचिवालयातील फाईल्स थांबून राहू नयेत म्हणून त्यांनी काल व्हीसीद्वारे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विभागांच्या ६५ फाईल्सचा निपटारा केला तसेच सूचना ही दिल्या.
सध्या अवकाळी पावसाचे वातावरण असून मुख्यमंत्र्यांनी त्याही अनुषंगाने मदत व पुनर्वसन विभागाला तयारीत राहण्याबाबत निर्देश दिले.
दरम्यान, आगामी निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढली जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री नाराज असल्याच्या चर्चांवर स्वत: शिंदेंनी ही काही लोकांची पोटदुखी असल्याचा टोला ठाकरे गटाला लगावला होता.