कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरण आता शांततापूर्ण असून स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, अशी माहिती छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली. ज्या दंगेखोरांनी रात्री किराडपुरा येथे तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे ८ ते १० पथक तयार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सध्या शहरात पुरेसा ३ हजार ५०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याविषयी माहिती देताना पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी सांगितले की, दंगेखोरांवर पोलीस कारवाई करत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दंगेखोरांना शोधून त्यांना अटक करण्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी केले.
निखील गुप्ता म्हणाले की, शहरातील सर्व लोक नेहमीच एकोप्याने राहतात. त्यामुळे आताही वातावरण चांगले ठेवण्यासाठी नागरिकांनी आम्हाला मदत करावी.