किसन कथोरे यांची विधानसभेत मागणी
मुरबाड: आज विधानसभेत मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर शेरे देऊन वनविभागाकडून केल्या जाणाऱ्या पिळवणूकीविरोधात आवाज उठवला. त्यानंतर यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३ एप्रिल रोजी बैठक बोलावली आहे.
शेतकऱ्यांकडील सातबाऱ्यावर खाजगी वने तसेच वनेत्तर कामाव्यतिरिक्त वापरास बंदी असे शेरे आणि नोंद झाल्यास शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी सबसिडी तसेच इतर योजनांचा लाभ घेता येत नाही. त्याचबरोबर त्यांना कर्ज घेण्यास आणि जमिन विकसित करण्यातही अडचणी येतात. वन विभागाकडून होणारी ही पिळवणूक तात्काळ थांबावी यासाठी किसन कथोरे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याबाबत भूमिका मांडली.
यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयावर ३ एप्रिलला सायंकाळी ४ वाजता बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला भारतीय वन अधिनियम कलम ३५चा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.