आमदार नितेश राणे यांची मागणी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गेल्या दोन-तीन दिवसांपासून शीतल म्हात्रे प्रकरणात खालच्या स्तराच्या कार्यकर्त्यांना पोलीस अटक करत आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाइंड कधी तरी शोधणार की नाही? यासाठी युवा सेनेचे प्रमुख तसेच माथाडी सेनेचे प्रमुख यांना चौकशीला बोलवावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत केली. माहितीच्या मुद्द्याच्या आधारे त्यांनी हा विषय उपस्थित केला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अनेक लहान कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. वरुण सरदेसाई नावाचा एक इसम काहीतरी बोलतो आणि त्यानंतर कोणीतरी कार्यकर्ते जातात हे योग्य नाही. कधीपर्यंत साईड अॅक्टरना अटक करणार? मुख्य चोरांना पकडा ना… कधी तरी उचला ना, असे आवाहनही राणे यांनी केले.
त्या आधी माहितीच्या मुद्द्याच्या आधारे सदा सरवणकर यांनी शीतल म्हात्रे यांचा फोटो मॉर्फ करून केल्या जात असलेल्या बदनामीच्या विषयावर भाष्य केले. या प्रकरणी पोलिसांनी मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचे जावई गुरुनाथ दुर्गे यांना अटक केली आहे. ही फार मोठी साखळी आहे. महिलांना बदनाम करणे हा यांचा उद्योग आहे. शीतल म्हात्रे यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर काल दोन तरुण त्यांचा पाठलाग करत होते. त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी शंभर नंबरवर फोन करून पोलिसांची कुमक मागवली आणि हा हल्ला टाळला. त्या प्रकरणी दादर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. दादर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी श्री सिद्धिविनायक मंदिर येथील कंत्राटी कर्मचारी आहेत.