लखनौ: उत्तर प्रदेशातल्या ओरैय्या जिल्ह्यातली एका तरुणीनं एक वेगळाच निर्णय घेतला. तिचा निर्णय ऐकून तुम्हीही चाट पडाल आणि डोक्याला हात लावाल.
वय ३० वर्षे असलेल्या या तरुणीचे एमए एलएलबी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. या मुलीचं नाव रक्षा असून तिच्या घरात लग्नाचा विषय सुरु झाल्यावर तिनं असा काही हट्ट केला की घरच्यांना काय करावं हे सुचेना. तिचा हट्ट होता की मला लग्न करायचंय तर कृष्णाशीच!
रक्षाची लहानपणापासूनच कृष्णावर नितांत श्रद्धा होती. कृष्णाच्या भक्तीत ती तासन् तास रमून जायची. पण आयुष्याच्या एवढ्या मोठ्या प्रसंगातही तिचं कृष्णप्रेम टिकून राहिल, असं कुणाला वाटलं नव्हतं. ती घरच्यांना म्हणाली, कृष्ण भगवान माझ्या स्वप्नात आले होते. त्यांनी स्वतःहून माझ्या गळ्यात वरमाला घातली. मग काय घरच्यांनाही तिचा हट्ट पुरवावा लागला.
घरच्यांची परवानगी मिळताच रक्षाने हिंदू विधीनुसार, भागवान कृष्णासोबत लग्न केले. मेंहदी, हळद, बांगड्या सगळे विधी पार पडले. लग्नाचा मंडपही सजला. या लग्नामुळे रक्षा खूप खुश आहे. लेकीचा आनंद पाहून आई-वडिलांनीही त्यातच आनंद शोधलाय. आता भगवान श्रीकृष्ण आमचे जावई बनून घरात विराजमान होतील, आम्ही खुश आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे. तर रक्षाच्या मोठ्या बहिणीनेही यावरून समाधान व्यक्त केलंय. आता मथुरेशी आमचं नवं नातं तयार झाल्याचं ती म्हणाली.