न्यायालयीन कोठडी १४ दिवसांनी वाढली
मुंबई : कुख्यात डॉन दाऊत इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारात अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार देत न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली. त्यामुळे अद्याप मलिकांना दिलासा मिळण्याची काहीच चिन्हे नाहीत.
कुर्ला येथील जमीन गैरव्यवहारात नवाब मलिक यांच्यावर विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. तेव्हापासून मलिक जामिनाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यातच सध्या ते किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत आणि त्यांच्यावर कुर्ल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळावा, यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. मलिक यांची प्रकृती गंभीर असल्याचे उच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्य केले असले तरीही त्यांनी अद्याप जामीन मिळाला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस मलिकांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं दिसून येते आहे. दरम्यान, पुढील आदेशापर्यंत मलिक हे रुग्णालयातच राहतील, असे न्यायालयाने सांगितले.