Thursday, April 24, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यआंबा दिसला अन् आंबा रुसला...!

आंबा दिसला अन् आंबा रुसला…!

  • माझे कोकण: संतोष वायंगणकर

कोकणच्या बाबतीत परमेश्वराने मुक्त हस्ते उधळणच केली आहे. सृष्टीसौंदर्य तर इतके भरभरून दिले आहे की, जो कोणी कोकणात येतो तो कोकणच्या प्रेमात वेडा होताे. पांढऱ्या शुभ्र वाळूंचा किनारा, समुद्र, खाडी, नदी, डोंगर, कपारी या सगळ्यांमध्ये एक वेगळीच नजाकत आहे. हे पाहण्याची, अनुभवण्याची ज्यांच्याकडे दृष्टी आहे त्यांना त्याचा अगदी मनमुराद आनंद घेता येतो. या सृष्टीसौंदर्याची इतकी भुरळ पडते की, स्वप्नवत वाटणारे सारे एकाच जागी अनुभवताना कोणालाही आनंद हा होणारच! जसं इथे भरभरून सृष्टीसौंदर्य दिलंय त्याचबरोबर इथे मासे, आंबा, काजू, कोकम, नारळ, सुपारी, करवंद, जांभूळ हे सारं इथेच याच भूमीत पिकतं. कोकणातील मासे चविष्ट आहेत. इथल्या माशांची चवही मुंबईत, गोव्यात येत नाही, असे खवय्येच सांगतात. तसाच कोकणातल्या आंब्याचा स्वाद हा जगात भारी म्हणतात. इंग्लंडच्या राजघराण्यात कोकणातील देवगड हापूस जायचा. यामुळे जगभरात आपल्याकडच्या आंब्याला एक वेगळं स्थान प्राप्त झालेलं आहे; परंतु एक गोष्ट कबूलही केली पाहिजे आणि सांगितलीही पाहिजे. ही सगळी फळं लहरी निसर्गावरच अवलंबून आहेत.

पूर्वी ऋतुचक्र हे ठरलेलंच असायचं. ७ जूनला मृग नक्षत्राला हमखास पाऊस बरसायचा. मग नको रे… आता पाऊस थांबू दे, असं वाटेपर्यंत तो संततधार कोसळायचा. आता तसं नाही, आठ-दहा महिने पाऊस पडतो. पाऊस केव्हाही पडतो. पाऊस केव्हा कोसळणार हे जरी हवामान खात्याकडून आगाऊ सूचित करण्यात येत असले तरीही तो थांबवणं कुणाच्याच हाती नाही. या वर्षी नेमकं तसंच घडलं. पाऊस थांबायचं नाव घेईना. विशेषत: आंबा, काजू बागायतदार शेतकरी काय करणार? असा प्रश्न त्यांच्या समोर होता. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हा नको त्या प्रमाणात असल्याने सारंच बदलून गेलं. आंबा, काजू पिकासाठी जेव्हा थंडी हवी होती, तेव्हा पाऊस पडत होता. जेव्हा थंडी पडायला सुरुवात झाली, तेव्हा अचानक उष्णता वाढली. ऋतुमान सतत बदलत गेले. कोकणात या बदललेल्या कालचक्राचा फटका आंब्याला बसला. मोहर यायच्या हंगामात मोहर आलाच नाही. जेव्हा मोहर आला, त्याचवेळी त्याच्यावर कीटकांनी आक्रमण केले. उष्णता एवढी वाढली की, फळं गळून पडली. या आंबा, काजू, कोकम बागायतदारांना या होणाऱ्या त्रासातून बाहेर येण्यासाठी कोकणकृषी विद्यापीठातून काही उपाययोजना होतील, अशी अपेक्षा असते; परंतु कोकण कृषी विद्यापीठाकडून कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे संशोधन काही आजवर झालेलं नाही. यामुळेच कोकणातील आंबा, त्यावरच्या प्रक्रिया या सर्व बाबतीत काही ठरावीक मर्यादेपलीकडे जाऊ शकलेला नाही.

या वर्षी पाऊस, थंडी, उन्हाळा अशामध्ये आंबा बागायतीत मोहर दिसला आणि मोहर पाडून आंबा बागायतदार शेतकरीही खूश झाला. या वर्षी आंबा पीक भरपूर येईल ही अटकळ त्यांने बांधली; परंतु नेहमीप्रमाणे आंब्यावर असंख्य संकटे येतच असतात. कीटकांच्या आक्रमणांपासून आंबा बागायतीचे संरक्षण करतानाही बागायतदार शेतकऱ्याचे नाकीनऊ येतात. बागायतदार शेतकरी येणाऱ्या संकटाला फक्त सामोरा जात असतो. तो त्यांच्या-त्यांच्या बागायतीत होणारे नुकसान महाराष्ट्राला दाखवत नाही. याबाबतीत बागायतदार शेतकरी म्हणतो, जेव्हा आम्हाला फायदा मिळतो, तेव्हा जर आम्ही सांगत नसू, तर लहान-सहान नुकसानभरपाई कशाला सांगत राहायचे, असे म्हणणारेही आंबा बागायतदार आहेत.

जेव्हा आंबा बागायतीत फळ दिसायला लागली तेव्हा बागायतदार शेतकरी आनंदला; परंतु मध्येच दोन-चार दिवस कडक उन्हाळा सुरू झाला आणि अचानक आंब्याची फळं डागाळली. झाडांवरून मोठ्या प्रमाणावर फळ पडू लागली. मोठ्या प्रमाणावर नुकसानही बागायतदाराला सोसावे लागणार आहे. बागायतीत आंबा दिसला; परंतु हा बागायतीत दिसणारा आंबा शेतकऱ्यांना विक्री होऊन पैसे देईल त्याचवेळी खरं! तोपर्यंत काहीच खरं नसतं. आजवर हे अशाच पद्धतीने होत आहे. आंबा, काजू, कोकम, नारळ, सुपारी या सर्वच पिकांच्या बाबतीत आज-काल अंदाज बांधून काही ठरवणं अवघड आहे. मासेमारी करणारा मच्छीमारही आभाळाकडे पाहून आपले अंदाज बांधायचा. समुद्रात मासेमारी करायला काही धोका नाही ना! हे मच्छीमार किनाऱ्यावरून सांगू शकत होता. आता समुद्राच्या मध्यभागी येणाऱ्या लाटा आणि भोवऱ्यांचे अंदाज घेणे वर्षानुवर्षे मासेमारीच्या व्यवसायात असणाऱ्यांनाही अवघड झाले आहे. निसर्गाचं ऋतुचक्रच बदलले आहे. त्यामुळे त्या बदलाचा परिणाम फळपिकांवर मोठ्या प्रमाणावर जागोजागी होताना दिसतो. मेहनतीने चार पैसे शेतकऱ्यांना मिळत आहेत. आंबाही बागांमध्ये दिसला आणि कडक उन्हामुळे आंबा डागाळलाही. मेपर्यंत आंबा हंगाम लांबेल, अशी शक्यता बागायतदार शेतकरी व्यक्त करीत आहेत. मात्र बागायतदार शेतकरी म्हणतो आंबा दिसला आणि आंबा रुसलाही.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -