Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेकल्याणच्या जलतरण खेळाडूंची मोहीम फत्ते

कल्याणच्या जलतरण खेळाडूंची मोहीम फत्ते

मुरुड-जंजिरा ते पद्मदुर्ग हे अंतर पोहून केले पार

कल्याण (वार्ताहर) : महाराजांनी निर्माण केलेल्या राज्यातील अनेक गड किल्ले यांची दुरवस्था झाल्याने याकडे शासनाने लक्ष द्यावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सेक्रेड हार्ट स्कूल कल्याणच्या १४ विद्यार्थ्यांनी मुरुड जंजिरा किल्ला ते पदमदुर्ग असे एकूण ९ कि. मी. चे अंतर पोहून पार केले. ही सर्व मुले १२ ते १८ गटातील असल्याने या मुलांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या आणि आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष असलेल्या गड किल्ल्यांकडे आजच्या पिढीचे दुर्लक्ष होत आहे. या उपक्रमामुळे जलदुर्ग आणि गड किल्ल्यांकडे लोकांचे लक्ष वेधावे आणि त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची प्रेरणा मिळावी, महाराजांच्या इतिहासाची माहिती मिळावी अशा उदात्त हेतूने हा उपक्रम आयोजित केला असल्याची माहिती या मोहिमेचे प्रमुख श्रीराम म्हात्रे यांनी दिली.

या उपक्रमात कल्याणचे सक्षम म्हात्रे, अधिराज म्हात्रे, रोनित म्हात्रे, अमोदिनी तोडकर, समृद्धी शेट्टी, तृष्णा शेट्टी, अद्विता जोडकर, अभिप्रीत विचारे, ऋतुराज विचारे, श्रीरंग साळुंखे, सिद्धार्थ पात्रा, मयंक पात्रा, निनाद पाटील, समर मोहोपे हे धाडसी विद्यार्थी सहभागी झाले व मोहीम यशस्वीपणे पार पडली. तसेच सोबत शिक्षक रामचंद्र म्हात्रे, काशीनाथ मोहोपे, संदीप तोडकर, देवेंद्र साळुंखे, निलेश पाटील हे शिक्षक व पालकही होते.

उपक्रमाची सुरुवात जंजिरा किल्ल्यातून झाल्याने हजारो पर्यटकांनी मुलांना टाळ्या वाजवून प्रोत्साहित केले. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर ‘जय शिवाजी, जय जिजाऊ’ शिवरायांच्या गजरात मुलांनी पोहायला सुरुवात करून न दमता एका दमात हे अंतर पार केले. मुले पद्मदुर्गाला पोहोचली तेव्हा तिकडेही पर्यटक असल्याने त्यांनी शिवगर्जनेत मुलांचे स्वागत केले. किल्यात जाऊन भगवा ध्वज फडकवून सांगता झाली.

या सर्व मोहिमेसाठी सेक्रेड हार्ट शाळेचे संचालक अल्विन अंथोनी आणि मुख्याध्यापक विनिता राज यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची माहिती क्रीडा शिक्षक अविनाश ओंबासे यांनी दिली.

मुख्याधिकाऱ्यांचाही पोहत प्रवास

मुरुड समुद्रकिनारी किल्ल्यात जाण्याची तयारी सुरू असताना मुरूडचे मुख्याधिकारी पंकज भुसे रस्त्यावरून जात होते. त्यांनी विचारले ही मुले कुठे जात आहेत. जंजिरा किल्ल्यात पोहून जाणार हे समजताच गाडीतून उतरले व मी देखील यांच्या सोबत पोहून जाणार म्हणून बोटीत बसले. कोणतेही पोहण्याचे साधन नसताना गॉगल, टोपी, स्विमिंग सूट नसताना समुद्रात पोहण्यासाठी उतरले आणि न थांबता अंतर पार केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -