नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलचा १६वा हंगाम ३१ मार्चपासून सुरू होणार आहे. या हंगामात ३ संघांचे कर्णधारपद परदेशी खेळाडूंकडे सोपवले आहे. उर्वरित ७ संघांचे नेतृत्व भारतीय खेळाडूच करणार आहेत. सहा वर्षांनंतर आयपीएलमध्ये ३ विदेशी खेळाडूंकडे संघांच्या नेतृत्वाची कमान असेल.
आयपीएलच्या १६व्या हंगामामध्ये १० संघ सहभागी होणार असून गुरुवारी दोन संघांनी आपले कर्णधार जाहीर केले. दिल्ली कॅपिटल्सने जखमी ऋषभ पंतच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरची कर्णधारपदी निवड केली. त्याचवेळी सनरायझर्स हैदराबादने दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामची संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. मार्कराम आणि वॉर्नरच्या आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसची परदेशी कर्णधार म्हणून निवड केली होती. या तीन संघांकडेच सध्या परदेशी कर्णधार आहेत.
२०१७ च्या आयपीएल हंगामात ३ परदेशी खेळाडूंनी संघांची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर आता सहा वर्षांनंतर यंदा ३ परदेशी खेळाडूंकडे संघांच्या कर्णधारपदाची जबाबदारी असेल.