मुंबई (प्रतिनिधी): अनेक वर्षांपासून आपल्या प्रलंबित मागण्यांवर राज्यातील एकनाथ शिंदे – फडणवीस सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य आयोजित ‘जवाब दो’ आंदोलनात सहभागी होण्यासाठी ‘जय लहू जी, जय मातंग’ अशा गगनभेदी घोषणा देत बुधवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून आझाद मैदानाकडे मुंबई, ठाणे,नवी मुंबई सह राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील हजारोंच्या संख्येने आलेले मातंग समाजातील युवा कार्यकर्ते आणि लहुजी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह विविध तीस ते चाळीस संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कूच केले.
रेल्वे, बसेस, एसटी, खासगी वाहने यातून दूरवरचा प्रवास करून आलेल्या महिलांनी रणरणत्या उन्हात लेकरा-बाळांसह सहभागी होत मातंग समाजाची वज्रमूठ सरकार विरोधात रोष व्यक्त करीत उगारली. आझाद मैदानात चहुकडे कार्यकर्त्यांनी पिवळे ध्वज हाती धरले होते. विविध मातंग संघटनांचे मोठमोठे बॅनर्स आणि त्यावरील ठळक मागण्या, डोक्यावर पिवळ्या टोप्या तर काहीं महिलांनी परिधान केलेले फेटे, एकाच रंगाच्या साड्या, झब्बे – कुर्ते तर काही जणांनी ग्रामीण पोशाख परिधान केले होते.
पुणे, नगर, पंढरपूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकण पट्टा येथून आलेले बहुसंख्य तरुण ‘जवाब दो’ आंदोलनातून आपला संताप सरकारच्या नाकर्तेपणा विरोधात व्यक्त करीत होते. यावेळी जनहित लोकशाहीचे अशोक अल्हाट म्हणाले कि, ‘राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने अनुसूचित जातीच्या मातंग समाजाच्या विविध संघटनांचे आरक्षणाचे वर्गीकरण तात्काळ करायला हवे.तर बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजाच्या मुलांसाठी आर्टीची स्थापना व्हायला हवी, असे अशोक ससाणे म्हणाले.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण आंदोलनापैकी मातंग समाजाचे हे संस्था स्थापन झाली पाहिजे अशी मागणी करीत आंदोलनातून सरकारचे डोके नक्कीच ठिकाणावर येईल असे सुरेश साळवी म्हणाले. अशोक ससाने,बाबुराव मुखेडकर, एस.एस. धुपे, एडवोकेट गडीकर, अशोक उमप, लहू थोरात, प्रकाश जाधव हे मुंबईकर मातंग समाज बांधव आंदोलकांना व्यास पिठाकडे जाण्यासाठी आणि आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी धावपळ करताना दिसत होते.
या आंदोलनात पंढरपूर येथून आलेले दलित महासंघाचे पांडुरंग खिलारे, लहुजी शक्ती सेनेचे बापू घाडगे,माळशिरस येथून आलेले बहुजन रयत परिषदेचे संजय साठे, मातंग एकता आंदोलनाचे पुणे इथून आलेले कार्यकर्ते,बहुजन समता पार्टीचे सांगली येथून आलेले बळीराम रणदिवे, पंढरपूर लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा नेते जयसिंग मस्के आणि अशा अनेक संघटनेचे नेते आपल्या शेकडो कार्यककर्त्यांसह उपस्थित होते.