मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या चांगलीच संतापली आहे. कारणही तसेच आहे, काही पापराझींनी आलियाच्या घरासमोरील गच्चीवरुन लिविंग रुमचे फोटो काढले आहेत. तसेच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. त्यानंतर आलियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचा संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये तिने मुंबई पोलिसांना टॅग केलं आहे. आता पोलिसांनी आलियाशी संपर्क साधला असून तिला तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.
आलियाची पोस्ट काय आहे?
आलियाने संताप व्यक्त करत लिहिलं आहे, “मी घरातील लिव्हिंग रुममध्ये बसले होते. त्यावेळी कोणीतरी मला पाहतयं असं मला जाणवलं. मी खिडकीत येऊन पाहिल्यानंतर मला कळलं की, समोरच्या इमारतीच्या गच्चीवरुन फोटाग्राफर माझे फोटो काढत आहेत. एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावणं किती योग्य आहे? प्रायव्हसीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत.
मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘खार पोलिसांनी आलिया भट्टशी संपर्क साधला आहे. तसेच तिला सांगितलं आहे की, फोटोग्राफरविरोधात तक्रार दाखल करावी. पोलीस या प्रकरणाची चौकशी करतील.
आलियाच्या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहते देखील आपली प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करत आहेत. आलियाची पीआर टीम आता फोटोग्राफरच्या शोधात आहे. आलियाची आई सोनी राजदान यांनी म्हटलं की, “लवकरच पोलिसांनी त्या फोटोग्राफरवर कारवाई करावी”. अर्जुन कपूरने लिहिलं आहे की, “हे खूप लज्जास्पद आहे. सामान्य असो किंवा सेलिब्रिटी महिला आज त्या त्यांच्याच घरात सुरक्षित नाहीत, ही गंभीर बाब आहे”.