मुंबई : पुण्यापाठोपाठ मुंबईच्या सहायक पोलिस आयुक्तांना एकाने रात्री २ वाजण्याच्या सुमारास फोन करुन मीरा-भाईंदर येथे बॉम्बस्फोट घडवून आणू, अशी धमकी दिली आहे.
सहायक पोलिस आयुक्तांनी अधिक माहिती विचारली असता त्याने शिवीगाळ करून फोन कट केल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक आयुक्तांनी तातडीने मुंबईच्या पोलिस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली.
त्यानंतर मीरा-भाईंदर पोलिसांना तातडीने अलर्ट करण्यात आले. पोलिसांनी परिसराची तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. सहायक पोलिस आयुक्तांना आलेल्या धमकीच्या कॉलची चौकशी पोलिस करत आहेत.
फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे नाव यशवंत माने, असे सांगितले आहे. पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.