ब्रिस्बेन (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक स्पर्धेत रविवारी कोरोना पॉझिटिव्ह असतानाही आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू जॉर्ज डॉकरेल श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळला. आयर्लंड क्रिकेट बोर्डाने डॉकरेलला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी केली होती.
अष्टपैलू खेळाडू जॉर्ज डॉकरेलला आयसीसीच्या नवीन कोरोना गाईडलाइन्स आणि ऑस्ट्रेलियाच्या गाइडलाइन्सनुसार, खेळण्याची संधी देण्यात आली होती. कारण आयसीसीच्या सध्याच्या नियमांनुसार आता कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूला मॅच खेळण्यापासून आणि सराव करण्यापासून रोखले जाणार नाही. तथापि, पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूला सामना आणि सरावाच्या दिवशी सहकारी खेळाडूंपासून वेगळा प्रवास करावा लागतो.
टी-२० वर्ल्ड कपच्या अधिकृत वेबसाइटने डॉकरेलबद्दल जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉकरेलमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसली आहेत. आयर्लंडच्या वैद्यकीय पथकाने रविवारी खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी त्यांची उपलब्धता लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन आणि आयसीसीच्या सूचनेनुसार लोकांशी त्यांच्या भेटी नियंत्रित केल्या. आयसीसीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, विरोधी संघ आणि स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली होती.