Friday, April 25, 2025
Homeक्रीडाकिवींकडून ऑस्ट्रेलियाचा फडशा

किवींकडून ऑस्ट्रेलियाचा फडशा

टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत मोठा विजय

सिडनी (वृत्तसंस्था) : एका बाजूला देवॉन कॉनवेचा फलंदाजीतील झंझावात दुसरीकडे अप्रतिम सांघिक गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर कमालीची कामगिरी करत न्यूझीलंडने यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात शनिवारी मोठ्या पराभवाचा धक्का दिला. विजयामुळे न्यूझीलंडने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर -१२ मधील सलामीची लढत जिंकत आपल्या खात्यात २ गुण जमा केले आहेत.

न्यूझीलंडने दिलेल्या २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ सुरुवातीपासूनच दबावाखाली खेळत असल्याचे दिसले. दुसऱ्याच षटकात साऊदीने डेविड वॉर्नरचा त्रिफळा उडवत आपले इरादे स्पष्ट केले. चौथ्या षटकात सँटनरने विल्यमसनकरवी कर्णधार फिंचचा अडथळा दूर केला. ३० धावांवर २ फलंदाज बाद अशा अडचणीत ऑस्ट्रेलियाचा संघ अडकला. टीम साऊदी, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट या तिकडीने वातावरणाचा अंदाज घेत अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. त्या सापळ्यात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अलगद अडकत गेले. जसजसा सामना पुढे सरकत गेला, तसे बुडत्याचा पाय आणखी खोलात म्हणतात ना, याचा अनुभव ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीतून आला. सुरुवातच अनपेक्षित झाल्याने त्यातून सावरणे ऑस्ट्रेलियाला अखेरपर्यंत जमलेच नाही. १७.१ षटकांत १११ धावांवर त्यांचा संघ सर्वबाद झाला. टीम साऊदी, मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी ३ विकेट मिळवले. बोल्टने २ फलंदाजांना माघारी धाडले. लॉकी फग्युसन, इश सोढी यांनी प्रत्येकी १ फलंदाजाचा अडथळा दूर केला. ऑस्ट्रेलियाचे जवळपास सर्वच फलंदाज अपयशी ठरले. ग्लेन मॅक्सवेलने संघातर्फे २८ धावांची खेळी खेळली. अन्य बॅटर्सनी निराश केले.

फिन अॅलनने स्फोटक सुरुवात करून दिली. त्याने १६ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावा केल्या. त्यानंतर कॉनवेने मोर्चा सांभाळला आणि केन विलियम्सन व जिमी निशम यांच्यासह त्याने दमदार भागीदारी करून ऑस्ट्रेलियासमोर २०१ धावांचे तगडे आव्हान उभे केले. कॉनवे व केन विलियम्सन (२३) यांनी ६९ धावांची भागीदारी केली. जिमी निशॅमने कॉनवेला चांगली साथ दिली. कॉनवे ५८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ९२ धावांवर नाबाद राहिला. निशॅमने १३ चेंडूंत २ षटकारांसह नाबाद २६ धावा करताना किवींनी ३ बाद २०० धावांचा मोठा पल्ला गाठून दिला. निशॅम व कॉवने यांनी २४ चेंडूंत नाबाद ४८ धावांची भागीदारी केली. ग्लेन फिलिप्सनेही कॉनवेसह १८ चेंडूंत २७ धावा जोडल्या.

ऑस्ट्रेलियाचा फुसका बार

या सामन्यात दोन्ही आघाड्यांवर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अपयशी ठरले. सुरुवातीला गोलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे त्यांना प्रतिस्पर्ध्यांच्या धावा रोखता आल्या नाहीत. जोश हेझलवूडने २ विकेट मिळवले खरे, परंतु त्याला धावा रोखणे काही जमले नाही. अन्य गोलंदाजांचाही किवींच्या फलंदाजांनी खरपूस समाचार घेतला. गोलंदाजांच्या अपयशानंतर फलंदाजांच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष होते. पण गोलंदाजांचा कित्ता फलंदाजांनीही गिरवला. वॉर्नर, फिंच, मार्श, मॅक्सवेल, स्टॉयनीस, डेविड, वेड ही फलंदाजांची तगडी फळी पत्त्यासारखी कोसळली. त्यामुळे पहिल्याच लढतीत ऑसींना मोठ्या पराभवाची चव चाखावी लागली.

११ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचे घरच्यांसमोर वस्त्रहरण

मागील ११ वर्षांत ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याच फॉरमॅटमध्ये विजय मिळवण्यात अपयशी ठरलेल्या न्यूझीलंडने शनिवारी बाजी मारली. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडने सांघिक खेळ करताना यजमान ऑस्ट्रेलियाला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. डेव्हॉन कॉनवे व फिन अॅलन यांच्या दमदार फटकेबाजीनंतर मिचेल सँटनर, टीम साऊदी व इश सोढी यांनी गोलंदाजीत कमाल करून दणदणीत विजय मिळवून दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -